Pune : जिल्ह्यातील 350 महाविद्यालयात 14 सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज – महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची 100 टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी येत्या 14 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘विशेष नवमतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात येणार असून महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Wakad : गुटखा विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील लोकसंख्या सुमारे 3 लाख 59 हजार 839 असून या वयोगटातील मतदार संख्या केवळ 65 हजार 851 आहे. म्हणजेच 2 लाख 93 हजार 988 युवक मतदार होण्यासाठी पात्र होऊ शकतात. तसेच पुणे शहरात राज्याच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी शिक्षणासाठी 3 ते 5 वर्षे वास्तव्य करीत असल्याने त्यांची मतदार नोंदणी पुण्यात किंवा त्यांच्या मूळगावी होणे आवश्यक आहे.

जिल्ह्याची अंतिम मतदार 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना वर्षातून चार वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना बैठकीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असून समन्वयक अधिकारी आणि दोन प्रतिनिधींना ऑनलाईन मतदार नोंदणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

विशेष मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी 14 सप्टेंबर रोजी महाविद्यालयांना भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वत: महाविद्यालयांना पत्र लिहून यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती दिली असून त्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

मतदार नोंदणी अर्ज https://voters.eci.gov.in या लिंकवरून किंवा वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे ऑनलाईन भरता येतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांच्यास्तरावरून विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करावे. मतदार हा लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी महाविद्यालयांनी नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी पत्राद्वारे केले आहे.

या अभियानात भाग घेतलेल्या समन्वयक विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सहभागी विद्यार्थ्यांचा 25 जानेवारी 2024 रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिनी गौरव करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले 10 वी किंवा 12 वी चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक असल्याची माहितीही पत्राद्वारे देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.