Pune : ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करा -प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ‘कोरोना’ साथ नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्थानिक प्रशासनाला केल्या.  

जावडेकर यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि उपाययोजनांची माहिती घेतली. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले.

शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा झाली असून साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.

जावडेकर म्हणाले, ‘परदेशातून शहरात आलेल्या काही नागरिकांमध्ये ‘कोरोना’ची सकारात्मक लक्षणे दिसली आहेत. त्यांच्या संपर्कामुळे काही नागरिकांना संसर्ग झाला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासन करीत आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये पण, जागरूक राहावे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.