Pune : चांगल्या समाज निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची – कृष्णकुमार गोयल

एमपीसी न्यूज – “आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या समाजाप्रती (Pune)कृतज्ञतेची भावना ठेवत चांगले काम करत राहायला हवे. त्या कामाची समाज दखल घेतो. चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची आहे.

बंधुतेच्या याच विचाराला जीवन समर्पित करत समाजाला एकसंध ठेवण्याचे कार्य बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात बंधुतेचा विचार समाजाला योग्य दिशा देऊ शकेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन पुणे,(Pune) रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्य महोत्सवी (25वे) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी गोयल बोलत होते.

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुरुनानक सेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा, संमेलनाध्यक्ष कवयित्री मधुश्री ओव्हाळ, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. विजय ताम्हाणे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. शंकर आथरे आदी उपस्थित होते.

Maval : मळवंडी ठुले येथील साकव पुलासाठी 60 लाखाचा निधी
गेल्या चार दशकांपासून समर्पित भावनेने बंधुतेचा विचार पेरणाऱ्या बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना गोयल व मोखा यांच्या हस्ते सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्काराने, तर रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींना बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक असे काम करत आहेत. सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्कार हा त्याचे संचित आहे. एखादा सकारात्मक विचार मनात आला, की तेवढ्याच तीव्रतेने तो साध्य करण्यासाठी प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते. सामाजिक स्थिरतेसाठी बंधुतेची चळवळ कायम राहावी.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेच्या वाटेवर अनेकांना सोबत घेऊन प्रमाणिकपणे केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. या प्रवासात अनेकांची साथ मिळाली. आईने बंधुतेचा संस्कार दिला. त्यामुळे तो अधिक व्यापकतेने मनात भिनला. पैशामागे धावण्यापेक्षा विचारांच्या मागे धावत राहिलो आणि जीवन समृद्ध करत गेलो. जीवनातील प्रत्येक संघर्षावर बंधुता हाच उपाय आहे.”

संतसिंग मोखा, डॉ. विजय ताम्हाणे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी विचार मांडले. प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता झिंजुर्के यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.