Pune : डिजिटल प्रणालीचा वापर करून उषा बाजपेयी यांची गरजूंना ‘स्मार्ट’ मदत

 एमपीसी न्यूज – कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. विषाणूंचा धोका जास्त वाढल्यामुळे सर्व ठिकाणी मदत पोहचविण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांतील कष्टकरी, रोजंदारी मजुरांच्या कुटुंबीयांच्या गरजेनुसार ऑनलाईन पद्धतीने  दुकानदारांच्या खात्यात रक्कम जमा करून मदत कार्य करण्यात येत आहे. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संयोजिका उषा बाजपेयी यांच्या पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक कष्टकरी, रोजंदारी मजूर वर्गाचे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणाहून आलेल्या मागणीनुसार अन्नधान्य आणि वस्तूसाठी लागणारी रक्कम दुकानदाराला ऑनलाईन पद्धतीने जमा करून गरजूंना साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. सातत्याने मोबाईलवरून संपर्कात राहून अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिक गरजू कुटुंबीयांना त्यांची गरज पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याचे बाजपेयी यांनी सांगितले.

यामध्ये पुणे शहरातील मुंढवा, पठारे वस्ती, हडपसर, वडगाव शेरी, कामगार वस्ती, साळुंखे वस्ती, खळदकर वस्ती, जांभुळवस्ती, कुदळे वस्तींसारख्या अनेक वस्त्या तसेच सातारा, सोलापूरसारख्या शहरांचा समावेश आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी पेटीएम, गुगल पे, फोन पे व इतर अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.  व्यवहार त्वरित आणि सुरक्षित होत असल्यामुळे याचा चांगला उपयोग होतो. लॉक डाऊनमध्ये भारतभर जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न चालू ठेवणार असल्याचे बाजपेयी सांगतात. तसेच गरजूंना मदतीसाठी 9762111311 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.