Talegaon Dabhade: नगरपरिषदेच्या दारात बसविले ‘सॅनिटायझर मशीन’

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रवेशव्दाराजवळ हात न लावता सॅनिटायझर लिक्विड लावून पाण्याने हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेने राबवलेल्या या हात स्वच्छ करण्याच्या यंत्राची सर्वत्र चर्चा होत आहे. या अगोदर नगर परिषदेने जंतुनाशकाची फवारणी, धुरळणी, किराणा व भाजीपाला विक्रीच्या वेळा, 274 बेडच्या विलगीकरण कक्षाची निर्मिती आदी कामे केली आहेत.

याचा एक भाग म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचे मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचा-यांनी  या हात स्वच्छ करण्याच्या यंत्राची मांडणी केली आहे.
या यंत्रासाठी एका लोखंडी स्टँन्डवर 500 लिटरची पाण्याची टाकी बसविली आहे. नळाच्या डाव्या बाजूला सॅनिटायझर लिक्विड  तर उजव्या बाजूला पाण्याचा नळ आहे. प्रथम डाव्या पायाने दाबून सॅनिटायझर  हातावर घ्यायचा व नंतर उजव्या पायाने दाबून पाणी सुरु करून हात स्वच्छ करायचे.
या यंत्रामुळे नगर परिषदेत कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक यांना प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताना हात स्वच्छ करूनच आत प्रवेश करावा लागेल. त्यामुळे होणारा संसर्ग टळेल, असे मत मुख्याधिकारी झिंजाड यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.