Pune : मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील अनेक घडामोडीवर त्यांनी भूमिका मांडली.

  • यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येणार नाही. त्याप्रमाणेच देवेगौडासारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, असे भाकीत देखील त्यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्याबाबत काय निकाल लागतील? हे सट्टा बाजाराला देखील सांगता येईना. मी काय सांगणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जागा मिळतील आणि यातून आम्ही मान्यता प्राप्त पक्ष (पार्टी) होऊ, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

  • सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही – प्रकाश आंबेडकर
    बारामतीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल असे मला वाटत नाही. माझ्या मते सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही.

‘मी दुष्काळाचं मार्केटिंग करत नाही’
दुष्काळावर बोलताना ते म्हणाले की, मागील 50 वर्षात लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत. मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा 50 वर्षे सत्तेत असलेल्या प्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करत नाही. खरं म्हणजे हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे, असे सांगत शरद पवार आणि सत्ताधारी भाजपवर प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.