GT vs PBKS : पंजाब संघाने गुजरात संघाचा 8 गडी आणि चार षटके राखुन केला दणदणीत पराभव

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : प्रथम क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन विरुद्ध 7 व्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्ज 11 या दोन संघादरम्यान झालेल्या टाटा आयपीएल 2022 मधल्या आजच्या 48 व्या सामन्याला आज मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर सुरुवात झाली. ज्यात पंजाबने आज खरोखरच सुपर किंग्ज या नावाला जागत सुपर खेळ करत गुजरात संघावर संपूर्ण वर्चस्व गाजवत 8 गडी आणि चार षटके राखून पराभूत करत आपली विजयाची रुळावरून घसरलेली गाडी रूळावर आणली आहे आणि 7 व्या नंबरवरून चौथ्या नंबरवर झेपही घेतली आहे.

या आयपीएल मध्ये सर्वधिक सामने जिंकून अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटनच्या कर्णधारा पंड्याने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण आज तरी त्याचा हा निर्णय फारसा योग्य ठरला असे काही वाटले नाही.प्रतिभावंत असूनही सातत्य नसलेल्या शुभमन गील आजही फक्त 9 धावा काढुन धावबाद झाला, त्यानंतर वृद्धीमान साहा सुध्दा त्याच्या पावलावर पाऊल टाकत 21 धावा करून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला अन थोड्याच वेळात कर्णधार पंड्या सुद्धा फक्त 1 धाव करुन ऋषी धवनच्या गोलंदाजीवर बाद झाला,अन गुजरात संघाची अवस्था सातव्या षटकातच 3 बाद 44 अशी बिकट झाली.

या कठीण परिस्थितीत अनुभवी डेविड मिलर आणि युवा साई सुदर्शन ही जोडी एकत्र आली ,या जोडीकडून खूप अपेक्षा असताना मिलरने मात्र अपेक्षाभंग केला, त्याचा डाव आज काही रंगला नाही, आणि तो ही फक्त 11 धावा काढून लिविंगस्टोनला आपली विकेट देवून तंबूत परतला, यानंतर गुजरात टायटनच्या विकेट्स ठराविक अंतराने पडू लागल्या,आणि गुजरात संघ चांगलाच अडचणीत आला.

आधीच्या सामन्यातल्या विजयाचे शिल्पकार राहुल तेवतीया आणि रशीद खान रबाडाच्या लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले,आणि आज तरी गुजरात संघाला मोठी धावसंख्या रचू शकणार ही आशंका स्पष्ट होवू लागली, मात्र या कठीण परिस्थितीत जबरदस्त धैर्य, आणि सुपर क्लास दाखवत साई सुदर्शनने एक अविस्मरणीय खेळी करत संघाला किमान लढण्यासाठी बळ मिळेल इतकी धावसंख्याही गाठून दिली. त्याने आज आपले पहिले अर्धशतक तेही संघ अडचणीत असताना पूर्ण करून तो लंबी रेस का घोडा असल्याची प्रचिती देणारी खेळी केली, त्याने 50 चेंडूत नाबाद 65 धावा करताना 5 चौकार आणि एक षटकार मारला.

दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने योग्य ती साथ न मिळाल्याने गुजरात टायटनच्या आपल्या निर्धारित 20 षटकात 8 खंदया गड्याच्या मोबदल्यात  फक्त 143 च धावा लागल्या,पंजाब किंग्ज साठी कगीसो रबाडाने अप्रतिम गोलंदाजी करत चार गडी बाद करून गुजरात टायटनच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले,त्याला अर्षदीप सिंग,लिविंगस्टोन आणि ऋषी धवनने प्रत्येकी एकेक गडी बाद करुन गुजरात संघाचा डाव सावरू दिला नाही तो नाहीच.

पंजाब संघाला आपली गाडी रूळावर आणण्यासाठी विजयास प्राप्त करणे आज त्यांच्यासाठी मस्ट होते, आणि तो विजय मिळवण्यासाठी त्यांना करायच्या होत्या 120 चेंडूत 144 धावा,मात्र नमनालाच जणू नाट लागावा तसे जॉनी बेअरस्टो डावाच्या तिसऱ्याच षटकात शमीचे गिर्हाईक झाला आणि त्यांना पहिला धक्का  बसला,पण त्यानंतर मात्र शिखर धवन आणि राजपक्षे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 87 धावांची चांगली भागीदारी रचत विजयाच्या भोज्याकडे दमदार पाऊल टाकले.

भानुपक्षे या स्पर्धेत आतापर्यंत नेहमीच आक्रमक अंदाजात खेळला आहे,आजही त्याने त्याच अंदाजात फक्त 28 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार मारत 40 धावा करून  या भागीदारीत मोठा वाटा उचलला. ही जोडी चांगलीच जमली आहे असे वाटत असतानाच भानुपक्षे फर्ग्युसनला आपली विकेट देऊन बसला. पण त्याने विजयाची वाट पुढील फलंदाजांना दाखवून दिली होती.

दुसऱ्या बाजूने शिखर उर्फ गब्बर धवन आज आपल्या चिरपरिचित अंदाजात खेळत होता. याचदरम्यान त्याने आपले आणखी एक अर्धशतकही पुर्ण करून  चांगल्या फॉर्मचा कसा सदुपयोग करावा याचे सुंदर उदाहरणही दाखवले.त्याचा आदर्श घेत भानुपक्षेच्या जागी आलेल्या लियाम लिविंगस्टोन धुवांधार, स्फोटक खेळी करत विजय अगदीच सोपा करून टाकला. त्याने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सोळाव्या षटकात तीन उत्तुंग षटकार(यातला एक षटकार तर आतापर्यंतचा सर्वात लांब म्हणजे 117 मीटर होता) मारत आपल्या संघाला 8 गडी आणि तब्बल चार षटके राखून दणदणीत विजय मिळवून देताना गुजरातने आधीच्या सामन्यात केलेल्या पराभवाची सव्याज परतफेडही केली आहे.

या मोठ्या विजयाने पंजाब संघ 7 व्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे,आणि या विजयाने त्यांच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याची आशाही जिवंत राहिली आहे.तर गुजरात मात्र या मोठ्या पराभवाने सुद्धा आपल्या प्रथम क्रमांकावर 16 गुण मिळवून विराजमान आहे.

जबरदस्त गोलंदाजी करत चार गडी मिळवून गुजरात संघाची फलंदाजी खिळखिळी करणारा रबाडा सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन
8 बाद 143
साहा 21,तेवतीया 11,मिलर 11,साई सुदर्शन नाबाद 65
रबाडा 33/4, ऋषी धवन 26/1,अर्शदीप 36/1
पराभूत विरुद्ध

पंजाब सुपर किंग्ज
16 षटकात 2 बाद 145
धवन नाबाद 62,लिविंगस्टोन नाबाद 30(2 चौकार,3 षटकार)भानुपक्षे 40
शमी 43/1,फर्ग्युसन 29/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.