Manobodh by Priya Shende Part 26 : मनोबोध भाग 26 – देही रक्षणा कारणे यत्न केला

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 26

देहे रक्षणा कारणे यत्न केला

परी शेवटी काळ घेवोनी गेला

करी रे मना भक्ति या राघवाची

पुढे अंतरी सोड चिंता भावाची

प्रत्येक माणसाचा प्रयत्न हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालू असतो. आपण स्वतःला सुरक्षित कसे राहू हे, माणूस आधी बघतो. देहाला चांगलं खायला, प्यायला पाहिजे. राहायला चांगलं घर पाहिजे. प्रवासाला चांगली गाडी पाहिजे. या देहाचे लाड पुरवण्यासाठी तो सतत कष्ट पण करत असतो.

स्वतःलाच नाही तर, फार पुढे जाऊन, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता तो बघत असतो. त्या पलीकडे त्याची नजर पोहोचत नाही. सतत त्या देहा विषयी आसक्ती असते. त्यामुळे समर्थ पहिल्या चरणात सांगताहेत की, “देहे रक्षणा कारणे यत्न केला”. तरी याचं अंतिम फलित काय आहे तर, समर्थ म्हणतात की, “परी शेवटी काळ घेवोनि गेला.”

माणसाने कितीही देहाला जपायचा प्रयत्न केला किंवा त्याचं संरक्षण करायचा प्रयत्न केला तरी, त्याला मृत्यू अटळ आहे. हे सत्य तो टाळू शकत नाही. त्याला मृत्यूची कायम भीती असते. त्याला माहित आहे की, हा देह नाशिवंत आहे. नश्वर आहे. तरीसुद्धा माणूस देहावर जीवापाड प्रेम करतो. त्याला सतत जपत असतो.

पुढे समर्थ तिसऱ्या चरणात म्हणत आहेत की, “करी रे मना भक्ति या राघवाची”. समर्थ म्हणताहेत बाबा रे, तू तुझ्या देहाची चिंता करू नको.

त्यापेक्षा हे मना, तू राघवाची भक्ती कर. म्हणजे भगवंत, परमेश्वर, ईश्वर याची तू भक्ती कर. इथे आपण नवविधा भक्ती चे प्रकार बघुयात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन यातल्या कोणत्याही प्रकारे तू भक्ती कर. जेणेकरून काय होईल तर, दोन गोष्टी घडतील.

एक म्हणजे, मनात जी असुरक्षितता आहे, मृत्यूची भीती आहे, ती कमी होईल. मृत्यू तर अटळ आहेच. पण त्याला सामोरं जायची ताकद हा भगवंत तुला देईल. त्याच्यावर सगळी संकट सोडून दे. तो तुला तारून देईल हा विश्वास ठेव.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा संसार रुपी भवसागर आहे, तो कसा पार होईल, ही चिंता तुला लागलेली असते. ती पण त्याच्यावर, म्हणजे भगवंताच्या हवाली कर. तोच तुला हा भवसागर पार करून देईल. हा दृढ विश्वास बाळग. म्हणून समर्थ म्हणताहेत की, “पुढे अंतरी सोडी चिंता भवाची”.

हेच आपण अशा प्रकारे समजू शकतो की रे मना तुझ्या मध्ये सतत वाहत असणाऱ्या काळच्या चिंता दुःख भीती हा भवसागर पार कसा होईल याची सतत वाटणारी काळजी संसारातील काळजी ती अगदी शिक्षण नोकरी पैसा लग्न बायको मुलं त्यांचे शिक्षण इत्यादी इत्यादी ह्यातून बाहेर पडायचं असेल तरी ईश्वराला शरण जा.

त्याची भक्ती कर तुझ्या चिंता काळजयांना त्याच्या सुपूर्त कर. सतत त्याचं नाव घे. कारण तोच तुला यातून तारणार आहे. तू कितीही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अहोरात्र धडपडला तरी, तो मृत्यू म्हणजे काळ हा, तुझ्यावर झडप घालणारच आहे. हे न विसरता तू, फक्त परमेश्वराचं नाव घे. कारण तोच तुझं तारण करणार आहे.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.