Rajgurunagar Bank Five Year Election : राजगुरुनगर बँक निवडणूक निकाल; भीमाशंकर पॅनलला 12 तर परिवर्तन पॅनलला अवघ्या 4 जागा

एमपीसी न्यूज : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल रविवारी 6 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajgurunagar Bank Five Year Election voting) झाले. विद्यमान मंडळींच राहणार की काही ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी राजगुरुनगर मध्ये चंद्रमा मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. सायंकाळी उशिरा निकाल हाती आले . विद्यमान संचालकांच्या राजगुरुनगर भीमाशंकर पॅनलला 12 जागा मिळाल्या असून राजगुरुनगर सहकार परिवर्तन पॅनलला अवघ्या जागा मिळाल्या आहेत.

बँकेच्या सर्वसाधारण गटातील 12 जागांसाठी एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील भीमाशंकर पॅनेलचे सर्वसाधारण गटातून किरण आहेर, राजेंद्र सांडभोर , किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज, समीर आहेर, दिनेश ओसवाल,राहुल तांबे पाटील, अरुण थिगळे, सागर पाटोळे, दत्तात्रय भेगडे विजयी झाले. परिवर्तनचे गणेश थिगळे, विनायक घुमटकर यांनी सर्वसाधारण गटातून विजय मिळवला.

भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 1 जागेसाठी रामदास धनवटे व डी. के. गोरे यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये परिवर्तनचे रामदास धनवटे यांनी दणदणीत विजय मिळवला. महिला गटातील दोन जागांसाठी विजया शिंदे, हेमलता टाकळकर, अश्‍विनी पाचारणे यांच्यात तिरंगी लढत झाली. विद्यमान संचालिका हेमलता टाकळकर यांना धक्कादायकरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. भीमाशंकर पॅनेलच्या विजया शिंदे आणि परिवर्तनच्या अश्विनी पाचारणे यांनी विजयश्री खेचून आणली.

Talegaon Dabhade : मेथोडिस्ट चर्चच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

ओबीसी गटातील एका जागेसाठी धनंजय कहाणे, अविनाश कहाणे व धनंजय भागवत यांच्यात तिरंगी लढत झाली. भीमाशंकर पॅनेलचे अविनाश कहाणे यांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातून विजय डोळस यांची या आधीच बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनेलला 16 पैकी 12 जागांवर घवघवीत बहुमत मिळाले. विरोधातील राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलने 4 जागांवर समाधान मानावे लागले. सुरूवातीपासूनच अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीमध्ये यंदा साम-दाम तंत्राचाही उपयोग केला गेल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. कधी नव्हे तो राजकीय आखाड्यासारखेच स्वरूप या निवडणूकीस यंदा प्राप्त झाल्याने आजचा मतमोजणीचा दिवसही सभासदांची अतिशय उत्कंठा वाढविणारा ठरला.

मतमोजणी केंद्रातून जाताना सर्वच उमेदवारांनी पारंपरिक वाद्य, डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या. अनेकांनी गुलाल उधळला.मतदान आणि मतमोजणी दरम्यान पोलिसांनी नियोजन करण्यापेक्षा नाहक दांडगाई केली असा आरोप दोन्ही पॅनेल व मतदारांनी केला. रविवारी राजगुरूनगर मतदान केंद्रावर तर उमेदवारांना पोलिसांनी थेट ढकलुन दिले. त्यात महिला उमेदवार सुद्धा होत्या. त्यामुळे गर्दी, गोंधळ असे वातावरण दिवसभर पाहायला मिळाले.दोन महिला उमेदवारांमध्ये यावरून मतदान केंद्रात बाचाबाची झाली. सर्व निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांशी पोलिसांनी अरेरावीचे वर्तन केले. आज निकालाची कोणत्याही प्रकारची माहिती दिवसभर बाहेर न पडल्याने बाहेर उन्हात तिष्ठत बसलेल्या नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.