Ramdas Athavale News : राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष त्वरित निवडून पक्षाला एक चेहरा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. या मागणीवरून अनेक वाद देखील झाले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे चा पक्षाची हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष ‘काँग्रेस’मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वरून यासंदर्भात ट्विट केलं आहे.

रामदास आठवले त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.”

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून काही दिवस काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांचे नाराजी नाट्य देखील चालले. तर, गांधी घराण्याव्यतिरीक्त इतर कोणाकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्याचा विचारंही करण्यात आला होता. याला सोनिया गांधी यांनी समर्थन देत राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.