India Corona Update : चिंता वाढली ! 24 तासांत उच्चांकी 90,633 नवे रुग्ण, 1,065 मृत्यू

देशाचा रिकव्हरी रेट 77.32 टक्के आहे तर, 1.72 टक्के मृत्यूदर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला असून मागील 24 तासांत तब्बल 90 हजार 666 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 1,065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 41.13 लाखांवर पोहोचली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची होणारी विक्रमी वाढ देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या 41 लाख 13 हजार 812 एवढी झाली आहे. सध्या 8 लाख 62 हजार 320 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, 31 लाख 80 हजार 866 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 1,065 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात कोरोनामुळे दगावलेल्या मृतांची संख्या 70 हजार 626 इतकी झाली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 10 लाख 92 हजार 654 नमुने तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत देशभरात 4 कोटी 88 लाख 31 हजार 145 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सध्या 20.96 टक्के सक्रिय रुग् आहेत . मागील 24 तासांत देशभरात 73 हजार 642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 77.32 टक्के आहे तर, 1.72 टक्के मृत्यूदर आहे.

एकत्रित संख्येचा विचार केला तर, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 60 % पेक्षा जास्त रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे 25% सक्रिय रुग्ण आहेत, त्याखालोखाल आंध्र प्रदेश (12.06 %), कर्नाटक (11.71%), उत्तर प्रदेश (6.92 %) आणि तमिळनाडू (6.10 %) मध्ये रुग्ण आहेत.

केंद्र सरकारने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजना करण्यावर आणि मृत्युदर 1 टक्क्याखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, मृत्युदर कमी राखण्यासाठी प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर प्रभावी देखरेखीसह रुग्णांचा जीव वाचवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.