Pimpri News: रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु

एमपीसी न्यूज : पैस कल्चरल फाउंडेशन आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या वतीने आयोजित रंगयात्री(रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या चिंचवड येथील ‘पैस रंगमंच’ येथे हा महोत्सव ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळात होत आहे. हा महोत्सवाला निशुल्क प्रवेश असून अधिकाधिक रसिकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी केले आहे.

थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी पैस करंडक ही एकपात्री आणि नाट्यछटा स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा ५ ते १५ आणि त्यापुढील खुला गट अशा दोन गटांत झाली. स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल १७ डिसेंबर रोजी जाहीक करण्यात येणार आहे. शनिवारी १० डिसेंबर रोजी अनीहा निर्मित रमेश भिडे यांचे ‘मी आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ हे एकपात्री नाटक सादर झाले. प्रेक्षकांचा प्रतिसाद या नाटकाला लाभला. रविवार ११ डिसेंबर रोजी ‘ताई, मी कलेक्टर व्हयनू’ य़ा पुस्तकाचे लेखक आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी मुक्त संवाद होणार आहे. त्यानंतर सिनेरिओ निर्मित पु.ल. देशपांडे लिखित ‘माझी पाठ धरते’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Pune News: जिल्हा प्रशासनाकडून 500 आपत्ती मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

सोमवार, १२ डिसेंबर रोजी ज्येष्ठ रंगकर्मी मधु जोशी यांचा सन्मान आणि प्रकट मुलाखत होईल. त्यानंतर नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळ यांचे पात्र कथांचे कथा अभिवाचन होईल. शेवटच्या सत्रात कलाविश्व अॅडिक्टेड थिएटर्स यांचे कविता अभिवाचन होईल. मंगळवारी, १३ डिसेंबर रोजी आमचे आम्ही या संस्थेचे नाट्यवाचन होईल. शेवटच्या सत्रात नाटक दहा बाय वीस प्रस्तुत ‘द रेप’ हा एकल नाट्यप्रयोग होईल. बुधवार, १४ डिसेंबर रोजी गझलपुष्प प्रस्तुत मराठी गझल मुशायरा , दुस-या सत्रात नादवेध प्रस्तुत ‘राग एक रंग अनेक’ ही काव्य- गायन मैफल सादर होईल.

गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी थिएटर वर्कशॉप कंपनी निर्मित कृष्णाकाठचा शेरलॉक ही एकांकिका सादर होईल. शुक्रवारी (१६ डिसेंबर) शेवटच्या दिवशी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या सांगितिक प्रवासावरील पुस्तकाचे प्रकाशन, लेखिका डॉ. कस्तुरी पायगुडे यांच्याशी मुक्त संवाद आणि सांगितीक कार्यक्रम सादर होईल. रंगयात्री महोत्सवाचा शेवट १७ डिसेंबर रोजी थिएटर वर्कशॉप कंपनी निर्मित ‘मूक मिरवणूक’ या नाट्यप्रयोगाने होईल. अधिकाधिक रसिकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.