Pimpri News: ‘आरोग्यसेविकांची मुलाखतीद्वारे भरती अचानक रद्द केल्याने परीक्षार्थींना मानसिक त्रास; संबंधित अधिका-यावर कारवाई करा’- रयतची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे 16 व 17 मार्च होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारण देत अचानक रद्द केली. त्यामुळे मुलाखतीसाठी आलेल्या 212 लोकांना मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आरोग्यसेविका मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थीनी, महिलांची प्रशासनाने जाहीर माफी मागावी, परत अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी व ज्यांच्याकडून ही चूक झाली त्यांना नोटीस देण्यात यावी अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साळवे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.

मात्र, प्रशासकीय कारण सांगून ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्यसेविका या पदासाठी मुलखाती देण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणावरून होतकरू/ गरजू विद्यार्थीनी/महिला आले होते. प्रशासनाच्या गलथान व बेजबाबदार कारभारामुळे प्रशासकीय कारण देत अचानक ऐनवेळी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे असे जाहीर करण्यात आले.

भरती प्रक्रिया रद्द करायची होती तर किमान 1 ते 2 दिवस अगोदर कळवणे गरजेचे होते. ऐन वेळी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे गरीब/होतकरू विद्यार्थीनी/महिला यांना मानसिक/आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्यसेविका भरती/मुलाखती साठी आलेल्या विद्यार्थीनी व महिला यांची प्रशासनाने जाहीर माफी मागावी व परत अशी चूक होणार नाही. याची दक्षता घ्यावी. ज्यांच्याकडून ही चूक झाली त्यांना नोटीस देण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.