Vadgaon Maval News : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असा नामविस्तार करा

 दिनेश ठोंबरे, तुषार वहिले यांची रेल्वे विभागाकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा नामविस्तार करून रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असे करावे अशी मागणी शिववंदना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे, मावळ तालुकाध्यक्ष तुषार वहिले यांनी केली आहे. याबाबत शिववंदना ग्रुपच्या वतीने पुणे रेल्वे मंडल प्रबंधक रेणू शहा, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी शिववंदना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे, मावळ तालुकाध्यक्ष तुषार वहिले यांच्यासह सोपान सावंत, गणेश काटकर, निलेश कडू, महादेव वाघमारे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की पुणे शहराला ऐतिहासिक महत्व असून छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब जिजाबाई यांनी पुणे शहराला नावारूपाला आणले. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर समजले जाते. जगभरातून येथे लाखो लोक फिरायला, शिक्षणाला,तसेच व्यवसाय -नोकरीच्या माध्यमातून येत असतात.

अशा पुण्यनगरीमध्ये शिवाजीनगर हे रेल्वे स्थानक असून यावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे.त्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. रेल्वे म्हणजे केंद्राचा विषय आहे म्हणून बरेच जण इच्छा असून काही करू शकत नव्हते. त्यामुळे शिववंदनाग्रुपने थेट रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह रेल्वेमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व पुणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे ठोंबरे व वहिले यांनी सांगितले. या निवेदनाचा विचार करून 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यापूर्वी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.