Pimple Nilakh News : स्मशानभूमीची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करणार – सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपळेनिलख स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून येथील वाढीव बेडचे प्रलंबित असणारे काम तसेच संरक्षण भिंत, प्रवेशव्दार आणि कमानीचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. ही कामे महानगरपालिकेने ताबडतोब पुर्ण करावीत. अन्यथा आगामी पंधरा दिवसांनी पिंपळेनिलख मधील नागरिक महानगरपालिका भवनासमोर प्रतिकात्मक अंत्यविधी करुन आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव सचिन साठे यांनी दिला आहे.

‘ड’ क्षेत्रिय कार्यालयात आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीत साठे यांनी पिंपळे निलख स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांतर आयुक्त तथा प्रशासन राजेश पाटील यांना याविषयी साठे यांनी लेखी पत्र दिले. पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख तसेच मकरध्वज यादव, विराज साठे आदी उपस्थित होते.

या पत्रात सचिन साठे यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपळेनिलख या गावाचा पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1986 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी गावाची लोकसंख्या मर्यादित होती. आता पिंपळे निलख – विशालनगर या भागाची लोकसंख्या चाळीस हजारांपेक्षा जास्त आहे. परंतू या परिसरात पिंपळे निलख येथे एकमेव दोन बेडची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची देखील दयनीय अवस्था झालेली आहे. येथील शेडचे पत्रे उडून गेलेले आहेत. संरक्षण भिंतीचे कामही अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.

 

कोरोना काळात येथे अंत्यविधी करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रशासक व लोकप्रतिनिधींविषयी नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आता 1 एप्रिल पासून कोरोनाचे सर्व निर्बंध शिथील होत आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सात हजार दोनशे कोटींचा अर्थसंकल्प आहे. श्रीमंत आणि स्मार्ट सिटी असा नावलौकिक असणा-या महानगरपालिकेचे कुशल प्रशासक आहात. आपण आपल्या अधिकारात तातडीने पिंपळे निलख स्मशानभूमीची दुरुस्ती आणि वाढीव बेडचे प्रलंबित असणारे काम तसेच संरक्षण भिंत, प्रवेशव्दार आणि कमानीचे काम ताबडतोब पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.