Pimpri : निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हरी डबीर यांचे निधन

एमपीसी न्यूज – निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हरी केशव डबीर यांचे अचानक उद्भवलेल्या दुर्धर आजाराने शुक्रवार (दि. 3 नोव्हेंबर) रोजी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पोलीस दलासह सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे.

हरी डबीर हे 1970 साली पोलीस हवालदार म्हणून पोलीस दलात पुणे येथे दाखल झाले. त्यांच्या कार्यशैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना 1994 साली पोलीस उपनिरीक्षक पदावर मुंबई बढती मिळाली. त्यानंतर 2000 साली सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना पुन्हा पुण्यात बदली आणि बढती मिळाली. 2007 साली पिंपरी पोलीस ठाण्यातून ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झाले.

डबीर हे एक कणखर व्यक्तिमत्व होते. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांना ओळखले जायचे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदापर्यंतचा त्यांनी पोलीस दलात प्रवास केला. पोलीस दलात कार्यरत असल्यापासूनच त्यांना सामाजिक आणि धार्मिक कार्याची ओढ होती. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात सर्वात जास्त वेळ घालवला. स्वभावातील गोडवा आणि बोलण्यातील मधुरता याच्या जोरावर त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांनी पायी चालत संपूर्ण अष्टविनायक दर्शन केले. तसेच साडेतीन हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा देखील त्यांनी पायी पूर्ण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.