Salman Khan : सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या दोघांना भुज मधून अटक 

एमपीसी न्यूज – बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील ( Salman Khan) घरावर रविवारी (दि. 14) पहाटे गोळीबार झाला. यानंतर मुंबई पोलिसांनी गुजरातच्या कच्छ मधील भुज येथून दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे थेट कॅनडा पर्यंत गेले होते. त्या दृष्टीने मुंबई पोलीस तपास करणार आहेत.

विकी गुप्ता (वय 21, रा. चंपारण्य, बिहार), सागर पाल (वय 24, रा. नरकटियागंज, चंपारण्य, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील घराच्या दिशेने पाच ते सहा राउंड फायर केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, सायबर पोलीस, फॉरेन्सिक टीम सलमानच्या घराजवळ दाखल ( Salman Khan) झाल्या.

दरम्यान, आरोपींनी वापरलेल्या दुचाकीची माहिती पोलिसांनी काढली आहे. ती जुनी दुचाकी आरोपींनी रायगड जिल्ह्यातून खरेदी केली होती. ती दुचाकी त्यांनी गोळीबाराचा गुन्हा करण्यासाठी वापरली असल्याने पोलिसांनी दुचाकी खरेदी विक्री प्रकरणातील लोकांची चौकशी सुरु केली.

या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने स्वीकारली असल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. त्याचाही मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पाठपुरावा केला असता त्या पोस्टचा आयपी ॲड्रेस  कॅनडा येथील असल्याचे समोर आले आहे. मात्र हा आयपी ॲड्रेस कॅनडा येथील दाखवत असले तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाल्याची शक्यता लक्षात घेत पोलीस ( Salman Khan) तपास करीत आहेत.

Karjat :  विरोधकांना मतदारसंघच माहीत नाही – महेंद्र थोरवे

रविवारी मुंबई पोलिसांनी अनेक पथके दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना केली आहेत. सन 1998 मध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान खान याने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या समाजातून येतो त्या समाजात कळविटांना देवाचा दर्जा आहे. त्यामुळे बिष्णोई टोळीकडून सलमान खानला धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते.

त्यामुळे या प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला गोळीबार करणारे दोघेजण गुजरात मधील भुज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.

आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना मंगळवारी मुंबईमध्ये आणले जाणार आहे. या प्रकरणात बिश्नोई गॅंगच्या सहभागाबाबतही त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. दोन्ही आरोपी मागील काही दिवसांपासून पनवेल मध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. पनवेल मध्येच सलमान खानचे फार्म हाऊस देखील आहे. त्यामुळे त्यांची नेमकी योजना काय होती याबाबतही पोलीस ( Salman Khan)  चौकशी करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.