Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ गर्डरसह क्रेन कोसळून भीषण अपघात;16 मजुरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  शहापूरमधील समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान  भीषण अपघात झाला (Samruddhi Highway Accident) आहे. समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सरलांबे गावाच्या हद्दीत काम सुरु असताना गर्डरसह क्रेन कोसळून 16 मजुरांचा मृत्यू झालाय तर अजूनही काही कामगार गर्डरखाली दबल्याची माहिती मिळत आहे.

Change of rule : आज 1 ऑगस्टपासून आर्थिक जगाशी संबंधित हे नियम बदलणार

समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात 16 मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. 16 मृतदेह हे शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन ते चार जण जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यांच्या सोबत डॉग स्कॉड देखील असून ढीगाऱ्या खाली दबले असणाऱ्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून चार ते पाच जखमी जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण कोसळलेल्या अडकल्याची भीती आहे.

एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या ढीगारा उपसण्याचे काम सुरू आहे. हे काम वेगाने सुरू आहे. मलब्याखाली आणखी काही जण असल्याची शक्यता असल्याने ती काळजी घेऊन बचाव कार्य सुरू आहे.

मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील शहापूर इथं झालेली भीषण दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांनी श्रध्दांजली अर्पण केली. अपघातातील जखमींना लवकर आराम मिळावा ही प्रार्थना. घटनास्थळी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी काम करत आहे.

बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती ट्विटद्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.