Pune News : दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

एमपीसी न्यूज – ‘दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून, प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील ॲड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. सनातन संस्था आणि ॲड. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही,’ असे स्पष्टीकरण सनातन संस्थेने दिले आहे.

‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, ‘ असे सनातन संस्थेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

‘नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे ॲड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे.’ असा खुलासा संस्थेने केला आहे.

तसेच, सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातन संस्थेने दिला आहे.

जमिनींच्या खरेदी व्यवहारांचे दाखले देत नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर ‘फडणवीस हे बॉम्ब फोडण्याची भाषा करून खोट्या आरोपांचे अवडंबर माजवत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं असा कोणाचाही कोणाशी संबंध जोडायचा झाला तर सनातन संस्थेचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असंही म्हणावं लागेल,’ असं नवाब मलिक म्हणाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.