Sangavi News: दिवंगत चित्रकार नारायण गायकवाड यांनी रेखाटलेल्या निळू फुले यांच्या भावमुद्रांचे अनावरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध चित्रकार दिवंगत नारायण बबन गायकवाड यांनी रेखाटलेल्या विविध भावमुद्रांचे अनावरण नुकतेच नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महापौर उषा तथा माई ढोरे व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. 

यावेळी ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, दिलीप कांबळे, चित्रकार कृष्ण ढोरे तसेच नारायण गायकवाड यांचे वडील जेष्ठ नाटककार बबन गायकवाड, नारायण गायकवाड यांच्या पत्नी स्वाती गायकवाड तसेच समारंभाचे निमंत्रक व नारायण गायकवाड यांचे बंधू प्रसिद्ध गायक अनिल गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार आणि कलेवर प्रेम करणारे अनेक कलाप्रेमी यावेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध चित्रकार नारायण गायकवाड यांच्या आकस्मित निधनाने एक प्रतिभावंत कलाकार पिंपरी चिंचवड शहराने गमावला ते रंगरेषांचा जादूगार होते. शासनाच्या सेवेत राहून आपल्या चित्रांमधून त्यांनी अनेक आरोग्य विषयक सामाजिक संदेश देण्याचे महान कार्य केले . त्यांनी रेखाटलेल्या नटसम्राट निळू फुले यांच्या भावमुद्रा जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे या कलाकृतींचे जतन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या कलाकृतींचे जतन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या कलाकृती नेहमी समाजाला व नवोदित कलाकारांना प्रेरणा देतील. पिंपरी चिंचवड शहराने नेहमीच कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. या भावमुद्रांच्या मांडणीची संकल्पना शहराच्या प्रथम नागरिक मा.उषा उर्फ माई ढोरे यांची आहे, या शब्दांत शंकर जगताप यांनी भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप कांबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.