Sangvi: ….महापालिकेने वेळीच लक्ष दिले असते तर तिघांचे प्राण वाचले असते

अनधिकृत बांधकाम सुरु असतानाही महापालिकेने केले अक्षम्य दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील बांधकाम चालू असलेल्या मंदिराचा सभामंडप कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे समोर आले आहे. या बेकायदा बांधकामाने तिघांचा बळी घेतला. बेकायदा बांधकाम सुरु असल्याचे माहित असतानाही महापालिकेने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. महापालिकेने वेळीच लक्ष दिले असते तर तिघांचे प्राण वाचले असते.

पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ बेकायदा सुरु असलेल्या मंदिराचा सभा मंडप बुधवारी (दि.20)कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंतोष दास (वय 29, रा. पिंपळे निलख. मूळ रा. पश्चिम बंगाल), चिदम्मा मनसोप्पा पुजारी (वय 30, रा. खडकी, पुणे), प्रेमचंद शिबू राजवार (वय 35, रा. लेबर कॅम्प, सांगवी. बारजापूर नदिया, पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण जखमी झाले आहेत.

पिंपळे गुरव गावठाण येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिर असून याचे दीड महिन्यापासून जीर्णोद्धाराचे काम सुरु होते. मुख्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर मंदिरासमोरच्या सभामंडपाचे काम सुरु होते. या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. सभामंडपाचे काम सुरु आहे. बुधवारी काम सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास मंदिराच्या सभामंडपाच्या भिंती कोसळल्या. यामध्ये दुर्दैवी तिघांचा मृत्यू झाला आहे.

मंदिराचे बेकायदा बांधकाम सुरु असताना महापालिकेने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. बेकायदा बांधकाम दीड महिन्यापासून चालू असतानाही त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. काम थांबविले नाही. या बेकायदा बांधकामाला तीन महिन्यापुर्वी नोटीस दिल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. नोटीस दिल्यानंतरही काम सुरु असताना महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने वेळीच लक्ष देऊन काम थांबविले असते. तर, तिघांचे प्राण वाचले असते.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”मंदिराचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरु होते. महापालिका वेळोवेळी कारवाई करत असते. स्व:ताहून मंदिर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची सविस्तर चौकशी केली जाईल. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांची समिती चौकशी करणार आहेत. कोण दोषी आहे. याची तपासणी केली जाईल. दोषी असणा-यांवर कारवाई करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.