Sangvi : बनावट फेसबुक अकाऊंटवरून भावनिक आवाहन करून युवकाला तीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – बनावट फोटो आणि नाव वापरून एका बहाद्दराने ‘आई आजारी असून तिची किडनी बदलायची आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे’ भासवून एका युवकाकडून तीन लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले आणि पसार झाला. फसवणुकीचा संशय आल्याने युवकाने तात्काळ पोलिसात धाव घेतली.

साहिल राजेशकुमार गुप्ता (वय 32, रा. कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव. मूळ रा. बी जे एन्क्लेव, चंदिगढ) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोदकुमार मेंदीरत्ता (रा. मारुतीविहार, चक्करपूर, फारुखनगर, गुरगाव, हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल यांचा रमन सोंख्ला हा मित्र आहे. त्याचा फोटो आणि नाव वापरून आरोपी विनोदकुमार याने एक बनावट फेसबुक प्रोफाइल तयार केले. त्याद्वारे त्याने फेसबुक मेसेंजर मधून फिर्यादी साहिल यांना मेसेज केला. त्यात त्याची आई आजारी आहे. त्यांची किडनी खराब झाली आहे. किडनी बदलायची आहे. यासाठी खूप खर्च येणार असून बाकीची रक्कम मी जमा केली असून चार लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही पैसे देऊ शकाल का? असे म्हटले.

साहिल यांनी मित्राची आई आजारी असून मित्र अडचणीत असल्याने त्याला मदत करायचे ठरवले. त्यानुसार साहिल यांनी त्यांच्या बँक खात्यातून आरोपीच्या बँक खात्यात तीन लाख रुपये पाठवले. मात्र आपण पाठवलेले पैसे मित्राच्या नव्हे तर अन्य दुस-याच्या खात्यात गेले आहेत. तसेच आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच साहिल यांनी तात्काळ सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.