Sangvi : एका ग्राहकाच्या कागदपत्रावर विदेशी नागरिकाला दिले सिमकार्ड ; दुकानदाराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ग्राहकाने सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कागदपत्रे दिली. दुकानदाराने ग्राहकाला दिलेल्या सिमकार्ड व्यतिरिक्त आणखी एक सिमकार्ड ग्राहकाच्या कागदपत्रांवर घेऊन ते सिमकार्ड विदेशी नागरिकाला दिले. त्याने त्या सिमकार्डचा वापर गुन्हेगारी कारवायासाठी केला. याबाबत मोबाईल दुकानदार आणि सिमकार्ड वापरणा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन दत्तात्रय कारंडे असे मोबाईल दुकानदाराचे नाव आहे. त्याच बरोबर विदेशी नागरिक शोलाडाॅय सॅम्युअल जॉय (वय 44, रा. पुणे. मूळ रा. नायजेरिया) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माणिक पांडुरंग वायदंडे (वय 38, रा. काटेपुरम चौक, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याचे पिंपळे गुरव येथे काटेपुरम चौकात श्री स्वामी समर्थ मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. या दुकानातून 2015 साली माणिक यांनी सीम कार्ड खरेदी केले. सीम कार्ड खरेदी करताना माणिक यांनी त्यांची मूळ कागदपत्रे दिली. माणिक यांच्या कागदपत्रांच्या आधारे रोहन याने आणखी एक सिमकार्ड सुरू केले. हे सिम कार्ड त्याने आरोपी जॉय याला वापरण्यासाठी दिले. जॉय याने त्याचा गुन्हेगारीसाठी वापर केला.

जॉय याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने जॉय याला पोलीस कोठडी सुनावली आहे. माणिक यांच्या नावावर असलेले सिम कार्ड जॉय याने वापरले याबाबत मोबाईल शॉपी दुकानदार रोहन आणि सिम कार्ड वापरणारा जॉय या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.