Juni Sangvi : विज्ञान अद्याप रक्त बनवू शकले नाही, त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्याय नाही – अभिनेते रामपाल यादव

एमपीसी  न्यूज – आज विज्ञान तंत्रज्ञान इतके पुढे गेले असून, आपण सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. मात्र, विज्ञान अद्याप रक्ताचा एक थेंबही बनवू शकले नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्याशिवाय पर्याय नाही. रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते रामपाल यादव यांनी केले.

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त जुनी सांगवी येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत नव्याने सुरू करण्यात आलेल्या चॅम्पियन कराटे क्लबचे उद्घाटन अभिनेते रामपाल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामपाल यादव बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, संज्योग वाघिरे, मंगला कदम, दत्ता साने, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, चॅम्पियन कराटे क्लबच्या संचालिका दीपिका बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या रक्तदान शिबिरात पहिले रक्तदाते हेमंत खंडू गाडे यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेते राजपाल यादव म्हणाले, रक्तदान शिबिरात मला सहभागी होता आले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आले पाहिजे. जेणेकरून रक्ताची गरज भागेल.

नानासाहेब शितोळे यांच्या स्मृती जागवत अजित पवार म्हणाले, की पिंपरी-चिंचवडचा जो विकास झाला आहे, या विकासात नानासाहेब शितोळे यांचे मोठे योगदान आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची नानासाहेब शितोळे यांची हातोटी होती. शरद पवार यांची पिंपरी- चिंचवडमध्ये जी काही विश्वासू माणसे होती, त्यामध्ये नानासाहेबांचे नाव अग्रस्थानी होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदान चळवळ वाढली पाहिजे, असे आवाहनही पवार यांनी केले.

रक्तदान शिबिरात रक्त संकलन महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटू शिंदे आणि शितोळेनगर क्रीडा मित्रमंडळाने सहकार्य केले. सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी, तर आभार गीता येरूणकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.