Sean Connery Is The Best Bond: सीन कॉनरी निर्विवादपणे ठरले ‘सर्वश्रेष्ठ बॉन्ड’

Sean Connery voted best Bond, with Timothy Dalton and Pierce Brosnan runners up सीन कॉनरी यांनी 1962 साली पहिला बॉन्ड साकारला. त्यानंतर 2015 ला स्पेक्ट्रामध्ये डॅनियल क्रेगने साकारलेला बॉन्ड पडद्यावर अवतरला.

एमपीसी न्यूज- ‘माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड’ असे म्हटल्यावर आजही आपले कान टवकारतात. आता दोन तास जबरदस्त फायटिंग, दोन्ही हातात घेतलेल्या बंदुकांमधून भन्नाट गोळीबार, विमाने, आलिशान चकचकीत गाड्या, सोबतीला मदमस्त ललना असा सगळा खच्चून भरलेला मालमसाला बघायला मिळणार याची खात्री असते. हा बॉन्ड जरी काल्पनिक असला तरी तो इतक्या प्रभावीपणे सादर करण्यात आलेला असतो की, तो प्रत्यक्षात असलाच पाहिजे असे शेवटपर्यंत आपल्याला वाटत राहते.

कादंबरीकार इयन फ्लेमिंग यांच्या कल्पनाविश्वात निर्माण झालेला ब्रिटीश सीक्रेट एजंट बॉन्ड 1953 साली कादंबरीच्या रुपात पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्याचे ‘007’ असे टोपणनाव देखील ठेवण्यात आले. आजही अनेक गाड्यांची नंबर प्लेट 007 अशी असते. पडद्यावर ‘डॉ. नो’ च्या रुपात पहिला बॉन्डपट आला. त्यात सीन कॉनरी यांनी पहिल्यांदा बॉन्ड साकारला.

त्यानंतर डेव्हिड निवेन, जॉर्ज लॅझेनबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पीअर्स ब्रॉस्नन आणि डॅनियल क्रेग यांनी बॉन्ड साकारले. प्रत्येक अभिनेत्याने आपापल्या परीने बॉन्डला साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सीन कॉनरी यांनी 1962 साली पहिला बॉन्ड साकारला. त्यानंतर 2015 ला स्पेक्ट्रामध्ये डॅनियल क्रेगने साकारलेला बॉन्ड पडद्यावर अवतरला.

नुकताच सर्वांत लोकप्रिय बॉन्ड कोण याचा सर्व्हे घेतला गेला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यात निर्विवादपणे पहिला बॉन्ड सीन कॉनरीचाच पहिला नंबर आला. असं म्हणतात ना की, ‘फर्स्ट लव्ह इज फर्स्ट लव्ह’. त्याचमुळे प्रेक्षकांनी पहिल्या बॉन्डलाच पसंतीची पावती दिली.

डेनियल क्रेग आणि रॉजर मूर यांच्या बॉन्डनी पण प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. रेडिओ टाइम्स डॉट कॉमने आपल्या वाचकांच्या माध्यमातून हा सर्व्हे केला होता. यात 44 टक्के मते सीन कॉनरी यांना मिळाली. तर 32 टक्के मिळवून टिमोथी डॉल्टन दुसरे आणि 23 टक्के मते मिळवून पियर्स ब्रॉन्सन तिसरे आले.

सध्या 89 वर्षांचे असलेले सीन कॉनरी यांनी पाच चित्रपटात ‘माय नेम इज बॉन्ड’ असे झोकात म्हटले. तसेच रॉजर मूरने सात चित्रपटात टिमोथी डाल्टनने दोन आणि पिअर्स ब्रॉन्सनने चार चित्रपटात बॉन्ड साकारला आहे. सध्याचा बॉन्ड डॅनियल क्रेग याची पाचवी फिल्म ‘नो टाइम टू डाई’ यंदा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.