Chikhali News : दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतील म्हणून विवाहितेला पाठवले माहेरी

एमपीसी न्यूज – विवाहितेला ट्युमरचा त्रास असल्याने तिच्यावर दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतील या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहीतेसोबत भांडण करून तिला माहेरी पाठवले. दरम्यान तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. माहेरहून 12 लाख रुपये आणण्याची मागणी केली असल्याबाबत विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती योगेश जगदीश तोलंबीया (वय 36), सासरे जगदीश तोलंबीया, सासू ज्योती तोलंबीया (रा. किशनगंज, इंदोर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 32 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती योगेश याने शिवीगाळ, अपमान करून दारू पिऊन येऊन मारहाण केली. सासू, सासरे विवाहीतेबाबत पतीला खोटे सांगत, त्यावरून पती विवाहितेला त्रास देत असे. सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे माहेरहून 12 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी तगादा लाऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

पहिल्या बाळंतपणाच्या वेळी विवाहितेचे सिझेरियन झाले. त्याचा खर्च तिने तिच्या वडिलांकडून आणावा अशी आरोपींची मागणी होती. दुस-या बाळंतपणाच्या वेळी विवाहितेला ट्युमरचा आजार झाला होता. तेंव्हा तिच्यावर उपचार करण्याएवजी पैसे खर्च होतील म्हणून सासरच्या लोकांनी विवाहीतेसोबत भांडण करून तिला माहेरी हाकलून दिले. 16 मार्च रोजी पतीने विवाहितेला विनाकारण शिवीगाळ करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.