Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील पाच घाटांवर सहा तासात सात हजार मूर्ती दान

संस्कार प्रतिष्ठानचा उपक्रम; गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेला उपक्रम यंदा बविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाच घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळी आठपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल सात हजार मूर्ती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून जमा करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी, थेरगाव पूल, बिर्ला घाट, मोरया गोसावी मंदिर घाट, केशवनगर या घाटांवर यावर्षी संस्कार प्रतिष्ठानचा मूर्ती दान उपक्रम सुरू आहे. प्रतिष्ठानचे 300 स्वयंसेवकवरील घाटांवर उपस्थित आहेत. सर्व स्वयंसेवक गणेश भक्तांना मूर्तीदान करून गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करीत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जमा केलेल्या सर्व मूर्त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड म्हणाले, “मागील 22 वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. नदी प्रदूषण टाळून गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रतिष्ठान दरवर्षी मूर्तीदान उपक्रम राबवित आहे. नागरिक देखील याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. यावर्षी 15 ते 20 हजार पेक्षा अधिक मूर्ती जमा होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.