Pune News : शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांची मविआ सरकारवर नाराजी, शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला स्थगिती देण्यात आली. ऐनवेळी ही शर्यत स्थगित करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मविआ सरकारच्या कारभारावर टीका करत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. 

बैलगाडा शर्यत रद्द करण्याच्या या निर्णयावर “महाविकास आघाडी आहे तर असू द्या, ती फक्त तुमच्या फायद्याची आहे” असे म्हणत  आढळराव-पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान पाटील म्हणाले, गेले दोन वर्षे मविआ सरकारमध्ये आहोत, पण पुणे जिल्ह्यात आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वार केले जातात. याच माध्यमातून पुण्यातील शिवसेना संपवण्याचं काम केलं जात आहे. पण आम्ही नेटाने तग धरून लढा देत राहू. महाविकास आघाडी म्हणून आमचं एकच म्हणणं आहे. पुण्यातील शिवसैनिकांना संपवू नका. त्यांना शिवसैनिक म्हणून जगू द्या, अशी खंत आढळराव-पाटील यांनी व्यक्त केली.

बैलगाडा शर्यतीला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर जिल्यातील मविआ सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत  शिवाजीराव आढळराव – पाटील यांनी शिवसेनेला लक्ष करण्यात आल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.