Shivajinagar – ऑर्डर काढून देतो म्हणून लाच घेणाऱ्या कोर्ट बेलिफाला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – ऑर्डर काढून देतो, असे सांगून एका व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपयांची लाच घेताना येथील शिवाजीनगर न्यायालयातील एका बेलिफाला लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाकडून अटक करण्यात आली. आज शनिवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून विविध ठिकाणी सापळे लावून भ्रष्टाचारी मंडळींना रंगेहाथ पकडण्यात येते. मात्र प्रत्यक्ष न्यायालयातच असे प्रकार वाढले असून त्यामुळे वकील वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर कांबळे असे रंगेहाथ पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जागेचा ताबा न देण्यासाठी तुम्हाला हवी तशी  ऑर्डर व काढून देतो, असे सांगून कांबळे याने लाचेची मागणी केली होती. मात्र संबंधिताने ही घ़टना एसीबी अधिकाऱ्यांना कळविली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अशा प्रकारचे प्रसंग न्यायालयीन प्रक्रियेत वाढले असल्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून झालेल्या कारवाईचे पुणे बारचे अध्य़क्ष श्रीकांत अगस्ते यांनी स्वागत केले. अशा कारवाईंमुळे भ्रष्टाचारी मंडळींच्या कारवायांना आळा बसेल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.