Maval : मावळात शिवसैनिक जोमाने लागले कामाला – रवींद्र मिर्लेकर

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित

एमपीसी न्यूज- कोणतीही निवडणूक आली की शिवसैनिक आदेशाची वाट पाहत नाही. धनुष्यबाण हाच शिवसैनिकांचा उमेदवार असतो. निवडणूक जाहीर होताच शिवसैनिक कामाला लागतात. मावळ लोकसभा मतदारसंघातही शिवसैनिक जोमाने कामाला लागले असून महायुती निश्चित विजयी होईल, असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीतील मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकजुटीने, एकदिलाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची माहिती देण्यासाठी आज (बुधवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, कामगार नेते इरफान सय्यद, सल्लागार मधुकर बाबर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत को-हाळे, महिला आघाडीच्या माजी संघटिका सुनीता चव्हाण, माजी शहरप्रमुख रामगिरी गोसावी, माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांच्यासह जुने शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, ” महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात विकासकामे केली आहेत. मावळात महायुतीसाठी परिस्थिती चांगली आहे. त्यांच्यासमोरील उमेदवार सक्षम नाही. विरोधी उमेदवाराची बारणे यांच्यासोबत तुलनाच होऊ शकत नाही असे सांगत रवींद्र मिर्लेकर म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने शिवसैनिक घडले आहेत. त्यांच्या विचाराने घडलेला जुना शिवसैनिक आशीर्वाद घेऊन पाठिशी उभा असून प्रचारात सक्रिय झाला आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत शिवसैनिक थांबूच शकत नाही. शहरात संघटना वाढत असून जुने अनुभवी शिवसैनिक आणि नवे सैनिक यांच्यात योग्य समतोल आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांनी एकदिलाने काम सुरु केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे”

“भाजप-रिपाइं, रासप, शिवसंग्राम या मित्रपक्षाचे कार्यकर्ते देखील मनापासून प्रचारात सक्रिय झाले आहेत. आम्ही शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचलो आहोत. शिवसैनिक, मित्र पक्षाचे कार्यकर्ते, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे घराघरात पोहचले आहेत. जनतेची मानसिकता ठरली असून सामान्य मतदार महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित आहे” असेही मिर्लेकर म्हणाले.

बाळा कदम म्हणाले, “शिवसेना-भाजप महायुतीचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ता स्वत: उमेदवार समजून काम करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एकोपा आणि एकजूट कामय आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिने मनापासून प्रचार करत आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहचत आहे” त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला आघाडीच्या माजी संघटिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, “जुने शिवसैनिक प्रचारात सक्रिय आहेत. प्रत्येकजण मनापासून काम करत आहेत. शिवसैनिकाला कोणाच्या आदेशाची गरज नसते. निवडणूक आली की शिवसैनिक प्रचारात सक्रिय होतात. धनुष्यबाणासाठी सर्वजण एकदिलाने, एकमनाने काम करत आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.