Pune Crime News: धक्कादायक ! पुण्यात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आदी अमित कर्वे (वय 15) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कर्वेनगर येथील काकडे सिटी मध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका खाजगी बँकेत नोकरी करतात तर आई शिक्षिका आहे. चार जणांचे हे कुटुंब कर्वे नगर परिसरातील काकडे सिटीत राहतात. शुक्रवारी घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर आदी एकटाच होता. सायंकाळी त्याची मोठी बहीण घरी आल्यानंतर तिला आदिने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले.

त्यानंतर आदिला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.