Pune News: धक्कादायक… 375 विमान प्रवाशांची चाचणी ; 15 पॉझिटिव्ह!

Shocking! out of 375 passengers tested for COVID-19, 15 reported positive on Pune airport today.

एमपीसी न्यूज : आंतरराज्यीय आणि परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक असताना देखील कुठलीही तपासणी केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्या पाच दिवसांत 375 प्रवाशांची अचानक चाचणी केली असता 15 जण पॉझिटिव्ह रुग्ण निघाले.  प्रवासी आणि विमान कंपन्या यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा हा आकडा वाढल्याने महापालिकेचा मात्र ताप वाढला आहे. विलगीकरणाची व्यवस्था देखील कोलमडून पडल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु सध्या दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून येणाऱ्या विशेषत: विमान आणि रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची चाचणी बंधकारक आहे. प्रवाशांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांचीही (आरटीपीसीआर) तपासणी करावी लागेल, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

हा चाचणी अहवाल दाखविल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, हेही आदेशात स्पष्ट असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी पुणे महापालिकेनेही लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वेस्थानकावर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. त्याचवेळी चाचण्या करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, बहुतांशी प्रवाशांनी चाचणी केली नसल्याचे दिसून येत आहे.

काही जणांकडे अहवाल नसल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितली. परिणामी, एवढ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा ताण आरोग्य खात्यावर येत असल्याची कबुलीही महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून लोक प्रवास करीत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची धोका आहे. प्रवाशांना विमानात प्रवेश देऊच नये. तसे झाल्यास पुढील धोका टाळणे शक्‍य होणार आहे. चाचणी न केलेल्या प्रवाशांमुळे अचानक व्यवस्थेत बदल करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.