Shravan Special: ओळख राज्य फुलांची आणि वृक्षांची

Identification of state flowers and trees गुजरातचे फूल झेंडू हे असून वृक्ष आंबा हाच आहे. मात्र गुजरातमधील आंब्याच्या प्रजाती वेगळ्या आहेत.

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की सध्या जी पिढी वयाच्या पन्नाशीत आहे किंवा त्यापेक्षा थोडी मोठी आहे, त्यांनी एक समृद्ध बालपण अनुभवले आहे. तेव्हा त्यांच्या आधीच्या पिढीसारखे कर्मकांडाचे वर्चस्व नव्हते. पण सुबत्ता होती. नवनवीन शोधांना सुरुवात होत होती. बदलांचे वारे वाहत होते. थोडेसे जुने पण होते, थोडे नवे पण होते. त्यावेळी सण समारंभ भावभक्तीने आणि आनंदाने साजरे होत होते. त्यात व्यापारीकरण नव्हते. तेव्हा श्रावण महिन्यात घरोघरी कहाण्या वाचल्या जात. आत्ताच्या पिढीला या कहाण्या म्हणजे काय हेच माहीत नाही. पण या कहाण्यांच्या निमित्ताने वृक्ष, वेली, फुले, फळांची ओळख होत असे.

सध्या हिंदु पंचांगानुसार श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात सणांची नुसती मांदियाळी असते आणि यावेळी निसर्ग देखील नवलाई नेसून नटलेला असतो. सर्वत्र हिरवेगार झालेले असते. पक्ष्यांचे कूजन सुरु असते. झाडांना नवीन पालवी असते.

वेगवेगळ्या फुलांची निसर्गात लयलूट असते. पण यातील फारच थोड्या फुलांची आणि झाडांची आपल्याला माहिती असते. त्यामुळे होतं काय की श्रावण महिन्यातील सत्यनारायणाची पूजा असो किंवा गणपतीची पूजा असो त्यात सांगितलेली पत्री आपल्याला माहितीच नसते. मग फुलवाला जे काही गवत देईल ते आपण घेऊन येतो. पण आता आपण डोळसपणे या फुलांची ओळख करुन घेऊया.

ही फुलांची, झाडांची माहिती रंजक असल्याने ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. जसे आपल्या देशाचे फूल, वृक्ष, प्राणी, पक्षी आहे. तसेच आपल्या प्रत्येक राज्याचे राज्य फूल आणि राज्य वृक्ष आहे. आपण या सर्वांची ओळख करुन घेऊया. यंदा गणपती बाप्पाचे स्वागत करताना ही स्वतः ओळखलेली फुले त्याला भक्तिभावाने अर्पण करु या.

भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वटवृक्ष आहे आणि फूल कमळ आहे हे आपल्यापैकी ब-याच जणांना माहीत असेलच. तसेच महाराष्ट्राचा राज्य वृक्ष हा आंबा असून फूल जारुल किंवा तामणाचे आहे.

आता आपल्या शेजारी राज्यांची फुले आणि वृक्षांची ओळख करुन घेऊया.

कर्नाटकाचे फूल कमळ आणि वृक्ष चंदन आहे. तामिळनाडूचे फूल अग्निशिखा म्हणजे कळलावी आणि वृक्ष ताडवृक्ष आहे. केरळचे फूल म्हणजे आपल्या पिवळ्या रंगाने लक्ष वेधून घेणारा बहावा असून वृक्ष कल्पवृक्ष म्हणजे नारळ आहे. तसेच गुजरातचे फूल झेंडू हे असून वृक्ष आंबा हाच आहे. मात्र गुजरातमधील आंब्याच्या प्रजाती वेगळ्या आहेत.

महाराष्ट्राची हापूस हीच खरी ओळख आहे. मध्यप्रदेशचे फूल पळस आणि वृक्ष वटवृक्ष आहे. आंध्रप्रदेशचे फूल म्हणजे ज्याला आपण कमळ म्हणून ओळखतो ती वॉटर लिली आहे आणि वृक्ष कडुनिंब आहे. गोव्याचा वृक्ष अर्जुन हा आहे.

भारतातील इतर राज्यांची फुले आणि वृक्ष पुढीलप्रमाणे आहेत-

उत्तर प्रदेश – ब्रह्मकमळ आणि अशोक
बिहार – कांचन आणि पिंपळ
राजस्थान – रोहिडा आणि शमी, ज्याला राजस्थानमध्ये खेजरी असे म्हणतात.
तेलंगणा – तरवड आणि शमी
जम्मू आणि काश्मीर -कमळ आणि चिनार वृक्ष. मात्र जम्मू काश्मीरमधील कमळे ही खरी कमळे असतात. ज्यांना आपण कमळ म्हणून ओळखतो ती शास्त्रीयदृष्ट्या वॉटर लिली असते.
हिमाचल प्रदेश – गुलाबी बुरांश किंवा -होडेड्रेंड्रॉन आणि देवदार
हरयाणा – कमळ आणि पिंपळ
चंदीगड – ढाक म्हणजे पळस, पलाश आणि आंबा
पंजाब – शीशमचा वृक्ष
छत्तीसगड – साल वृक्ष
ओदिशा – कमळ आणि वट वृक्ष
पश्चिम बंगाल – शेफाली म्हणजे पारिजातक आणि सप्तपर्णी म्हणजे चितवन
आसाम – फॉक्सटेल ऑर्किड आणि हॉलॉंग
अरुणाचल प्रदेश – फॉक्सटेल ऑर्किड आणि हॉलॉंग
मणिपूर – सिरॉय कमळ किंवा वॉटर लिली आणि तून किंवा महानीम
मेघालय – लेडी स्लीपर ऑर्किड आणि गमरी
मिझोरम – डान्सिंग गर्ल ऑर्किड आणि नाग केसर
नागालँड – रोडोडेंड्रॉन आणि भोज वृक्ष ज्यापासून पूर्वीच्या लिखाणासाठी भूर्जपत्रे वापरली जात.
सिक्कीम – नोबेल ऑर्किड आणि -होडेड्रेंड्रॉन किंवा बुरांश
त्रिपुरा – नागकेसर आणि अगर वृक्ष ज्याच्यापासून ऊद मिळतो.
पांडिचेरी – कैलासपती आणि बेल वृक्ष
अंदमान निकोबार बेटे – अंदमान रेडवुड
लक्षद्वीप – चक्का

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.