Flood News : आंध्र प्रदेश, तामिळनाडूत आस्मानी संकट ; 17 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता 

एमपीसी न्यूज – आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू राज्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घरे कोसळली आहेत तर, रस्ते दुभंगले आहेत. आंध्र प्रदेशात आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू असून जवळपास 100 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अनेक जण अडकून पडले आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली. यात नदीमध्ये दहा लोक अडकले. हे लोक मदतीची मागणी करत होते. अशात भारतीय वायुसेनेच्या एमआय 17 विमानाच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं.

तामिळनाडू आणि केरळमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे सबरीमाला मंदिर बंद करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

आंध्र प्रदेशात पावसामुळे पूर परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. पुराच्या पाण्यात बस बुडाल्यामुळे त्यातील अनेक प्रवासी बुडून मरण पावले आहेत. पुराच्या पाण्यात त्यांचे मृतदेह वहात आहेत. कडप्पा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. घरे कोसळली आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.