SNBP 28th Nehru All-India University Hockey Tournament : गतविजेत्या एमजी काशी विद्यापीठ संघाचे आव्हान संपुष्टात

पंजाबी विद्यापीठ साखळीत अपराजित संघ; अपयशी पारुल विद्यापीठाने स्विकारले 46 गोल

एमपीसी न्यूज – पुणे येथे सुरु असलेल्या एसएनबीपी 28व्या नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत गतविजेत्या एमजी काशी विद्यापीठ संघाचे आव्हान संपुष्टात आले. संबलपूर विद्यापीठ संघाने बाद फेरीत प्रवेश मिळविला. पंजाबी विद्यापीठ संघाने अव्वल स्थान पटकावत साखळीतील आपले वर्चस्व सिद्ध केले. साखळीत आतापर्यंत हाच एकमेव संघ अपराजित राहिला.

अखिल भारतीय विद्यापीठ संघटना आणि हॉकी इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, पुण्यातील एसएनबीपी संस्था स्पर्धेची प्रायोजक आहे. पिंपरी मधील नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानात आज साखळी सामन्यांची सनसनाटी अखेर झाली. अकरा गोल झालेल्या सामन्यात बंगळूर विद्यापीठ संघाने लव्हली विद्यापीठ संघाचे आव्हान 6-5 असे परतवून लावले. बंगळूरच्या विजयाने काशी विद्यापीठ संघाचे आव्हान संपुष्टात आले.

ड गटात बंगळूर संघ 6 गुणांसह अव्वल राहिला. त्यानंतर लव्हली विद्यापीठ संघाचे चार गुण झाले. एमजी काशी विद्यापीठ संघाचेही चार गुण झाले. मात्र, गोल सरासरीवर त्यांना गटातूनच बाहेर पडण्याची नामुष्की सहन करावी लागली.

पाचव्या मिनिटाला महंमद फवादच्या गोलने बंगळूर संघाने आघाडी घेतली. मात्र, दोनच मिनिटांनी धामी बॉबी सिंग याने बरोबरी साधली. त्यानंतर बंगळूरकडून सोमण्णा बी.पी. (14वे मिनिट), चिरनाथ सोमण्णा एन.डी (19, 25वे मिनिट) यांनी गोल केले.त्यानंतर लव्हली संघासाठी निशांत (15वे मिनिट), जगराज सिंग (23वे मिनिट), बालकर सिंग (29वने मिनिट) यांनी गोल केले. कमालीच्या वेगवान पूर्वार्धानंतर विश्रांतीला सामना 4-4 अशा बरोबरीत होता.

उत्तरार्धात शामंथ सी.एस.(33वे मिनिट) आणि विशाल यादव (36वे मिनिट) यांनी अनुक्रमे बंगळूर आणि लव्हली विद्यापीठ संघासाठी गोल करून बरोबरी कायम राखली. उत्तरार्धातही खेळ कमालीचा वेगवान झाला. सामन्याच्या 41व्या मिनिटाला शामंथ सी.एस. याने वैयक्तिक दुसरा आणि बंगळूरसाठी सहावा गोल केला. ही आघाडी मात्र त्यांनी अखेरपर्यंत कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी, संबलपूर विद्यापीठ संघाने आपली स्वप्नवत आगेकूच कायम राखताना पारुल विद्यापीठ संघाचा 11-1 असा पराभव केला. आजच्या दिवशी बाद फेरीसाठी पात्र ठरलेला हा पहिला संघ ठरला. पारुल विद्यापीठ संघाला सलग तिसऱ्या सामन्यात गदहापेक्षा अधिक गोल स्विकारावे लागले. ब गटातून संबलपूर विद्यापीठ संघाचे 2 विजय 1 बरोबरी असे सात गुण झाले. बंगळूर सिटी विद्यापीठ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले.

संबलपूरचा विजय सुनील जोजो (30, 60 आणि 60वे मिनिट) आणि नितेश (42, 44 आणि 45वे मिनिट) यांच्या प्रत्येकी तीन गोलने सुकर झाला. प्राजक्त नाग (8वे मिनिट) पात्रास तिर्की (15वे मिनिट) आणि मतियास दंग (25वे मिनिट) तसेच जोजोच्या गोलने संबलपूर संघाने मध्यंतरास 4-0 अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात बिकास लाक्रा (37वे मिनिट) नितेशची हॅटट्रिक, झेस ग्रेगरी (52वे मिनिट) आणि जोजोचे आणखी दोन गोल यामुळे संबलपूरचा मोठा विजय साकार झाला. पारुल साठी विराज सिसोदिया याने (36वे मिनिट) एक गोल केला. पारुल संघाला तिनही सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यांनी प्रत्येक पराभवात एक तरी गोल केला. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत तब्बल 46 गोल स्विकारले.

सी गटात पंजाबी विद्यापीठ संघाने यापूर्वीच बाद फेरी गाठली होती. त्यामुळे तसे स्वारस्य नसलेल्या सामन्यात त्यांनी आपले अपराजित्व कायम राखताना बनारस हिंदु विद्यापीठ संघाचा 6-1 असा पराभव केला. पंजाबी विद्यापीठ संघाने तीन सामन्यात 9 गुणांसह निर्विवाद वर्चस्व राखले. पुणे विद्यापीठ गटात दुसरे आले.

आजच्या सामन्यातच पंजाबी संघासाठी विकासने दुसऱ्याच मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर अन्वरुल्ला शाह याने 19व्या मिनिटाला बनारस विद्यापीठ संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर महकदीप सिंग (25वे मिनिट), हशिम (30वे), सुरज कुमार (40वे मिनिट), गुरुविंदर सिंग (49वे मिनिट), सुमित सैनी (56वे मिनिट) यांनी गोल करून संघाचा विजय भक्कम केला.

अ गटातील सामन्यात मनोनमनियम सुंदरनार विद्यापीठ,तिरुनेलवेली संगाने एलएनआयपीई, ग्वालियर संघाचा 3-1 असा पराभव केला.

निकाल – 

  • गट ए -मननियम सुंदरनार विद्यापीठ, तिरुनेलवेली: 3 (अजित कुमार एम 15 वे; निशी देवा अरुल 43वे, थांगा पांडियन एस 55 वे) वि.वि. एलएनआयपीई, ग्वालियर: 1 (तीर्थ उपाध्याय).मध्यंतर 1-0
  • गट ब – : संबलपूर विद्यापीठ, संबलपूर: 11 (प्राजुक्‍त नाग 8वे; पटरस तिर्की 15वे; मतियास डांग 25वे; सुनील जोजो 30वे, 60वे, 60वे; विकास लाक्रा 37वे; नितेश 42वे, 44वे, ग्रेनेस 45वे, ग्रेनेस 45वे मिनिट) वि.वि. पारुल विद्यापीठ, बडोदा 1 (विराज सिसोदिया ३८वा). मध्यंतर 4-0
  • गट क – पंजाबी विद्यापीठ, पतियाळा : 6 (विकास 2रे महाकदीप सिंग 25वे; हाशिम 30वे, सूरज कुमार 40वे, गुरविंदर सिंग 49वे, सुमित सैनी 56वे) वि.वि. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी: 1 (अनवरुल्ला शाह 19वे). मध्यंतर 2-1
  • गट ड – बंगळूर विद्यापीठ, बंगळूर : 6 (मोहम्मद फहाद एव्ही 5वे; सोमन्ना बीपी 14वे; चिरंथ सोमन्ना एनडी 19वे 25वे; शमंथ सीएस 33वे 41वे मिनिट) वि.वि. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा: 5 (धामी बॉबी सिंग 7वे एनईशांत 5वे जगराज सिंग 23वे बलकार सिंग 29वे; विशाल यादव 36वे). मध्यंतर 4-4

बादफेरीसाठी पात्र संघ

  • गट अ : व्हीबीएसपी विद्यापीठ, जौनपूर (7 गुण); गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (6 गुण)
  • गट ब : संबलपूर विद्यापीठ (7 गुण); बंगलोर सिटी युनिर्व्हसिटी, बंगळूर (6 गुण)
  • गट क : पंजाबी विद्यापीठ, पतियाळा(9 गुण); सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे (6 गुण)
  • गट -ड : बंगळूर विद्यापीठ, बंगळूर (6 गुण); लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (4 गुण)

अशा होतील उपांत्यपूर्व लढती – 

  • व्हीबीएसपी युनिर्व्हसिटी, जौनपूर विरुद्ध बंगलोर सिटी युनिव्हर्सिटी, बेंगळुरू
  • बंगळूर विद्यापीठ, बंगळूर विरुद्ध सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
  • संबलपूर विद्यापीठ विरुद्ध गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर
  • पंजाबी विद्यापीठ, पतियाळा विरुद्ध लव्हली प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, फगवाडा

बुधवारचे सामने –

  • व्हीबीएसपी युनिर्व्हसिटी, जोनपूर वि बंगळूर सिटी युनिर्व्हसिटी, बंगळूर – दुपारी 12.30
  • बंगळूर विद्यापीठ, बंगळूर विरुद्ध सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे – दुपारी 2.30

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.