Social Media Viral : सोशल मीडियाची सकारात्मक बाजू; ‘बाबा का ढाबा’चे दिवसातच रूप पालटले

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर दररोज आरोप, प्रत्यारोप, टीका, भांडणे होताना दिसतात. अफवांचे विषय देखील सोशल मीडियावर फार ट्रोल होतात. यामुळे अनेकजण सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करतात. पण काहीसा बदनाम झालेल्या याच सोशल मीडियाची भक्कम सकारात्मक बाजू समोर आली आहे. दिल्लीतील एका सर्वसामान्य ढाब्याचे सोशल मीडियामुळे रूप पालटले आहे.

गिऱ्हाईक नाही, मदत नाही म्हणून खंत व्यक्त करणाऱ्या ढाब्याच्या मालकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अक्षरशः त्यांच्या ढाब्यासमोर गिऱ्हाईकांच्या रांगा लागल्या आहेत. तर विविध क्षेत्रातून त्यांना मदतीचे हात देखील मिळत आहेत.

‘बाबा का ढाबा’ची कहाणी अशी की, दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात एक वृद्ध दाम्पत्य मागील 30 वर्षांपासून ढाबा चालवत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण दोघांचीही या दाम्पत्याच्या ढाब्यासाठी काहीएक मदत होत नाही. त्यात कोरोनामुळे बुडत्याचे पाय खोलात गेले आणि वृद्ध दाम्पत्याची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली.

या वृद्ध व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ते त्यांच्या अडचणी सांगत आहेत. रोज सकाळी सहा वाजता उठून हे दाम्पत्य जेवणाची तयारी करतात. साडेनऊ वाजता जेवण तयार असतं. पण एवढे कष्ट करूनही त्यांची कमाई नाममात्र असते. कोरोनापुर्वी थोडेफार पैसे मिळत होते. मात्र, अनलॉक झाल्यापासून त्यांच्या धाब्यावर गिऱ्हाईक येत नव्हते.

स्वाद ऑफिशियल या युट्यूब चॅनलने सर्वप्रथम या वृद्ध दाम्पत्याच्या ‘बाबा का ढाबा’चा व्हिडीओ बनवला. यानंतर वसुंधरा तनखा शर्मा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. ‘दिल्लीकरांनो शक्य असेल तर बाबा का ढाबा ला जा आणि जेवण करा’ असे आवाहन ट्विटमध्ये केले. बघता बघता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि इंटरनेटवर टॉप ट्रेंडमध्ये आला. काही तासातच बाबा का ढाबावर लोकांची गर्दी होऊ लागली.

अभिनेत्री स्वरा भास्कर, रवीना टंडन, सोनम कपूर, आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती, अभिनेता सुनील शेट्टी या दिग्गजांनी सुद्धा हा व्हिडीओ आपल्या आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. यामुळे सोशल मीडियाची एक चांगली बाजू समोर आली आहे. ढाबेवाल्या बाबांची परिस्थिती आता बदलत आहे.

व्हायरल झालेला मूळ व्हिडिओ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.