Somatane News : टोल माफीसाठी सर्व पक्षीय आक्रमक; सोमाटणे टोल नाक्यावर आंदोलन

स्थानिकांना टोलमधून सूट न दिल्यास आंदोलनाचा इशारा

एमपीसीन्यूज : सोमाटणे फाटा येथील आयआरबीच्या टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमध्ये सूट मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.6) सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना लवकरात लवकर सूट न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते अमोल शेटे, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, शिक्षण समितीच्या सभापती अनिता पवार, आदींच्या उपस्थितीत आयआरबी टोल व्यवस्थापन समितीचे वामन राठोड यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, टोल वसुलीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून फास्टटॅग व टोल कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे स्थानिक नागरिकांना नाहक टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे. स्थानिक नागरिकांची आर्थिक लूट होत असून, स्थानिक प्रवासासाठी टोल भरावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले, येत्या आठ दिवसात स्थानिक नागरिकांच्या वाहनांना टोल माफ झाला नाही तर आठ दिवसानंतर सर्व पक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच त्याला सर्वस्वी आयआरबी कंपनी जबाबदार असेल असेही ते म्हणाले.

तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे म्हणाले, टोल वसुलीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोमाटणे फाटा येथील आयआरबीच्या टोलनाक्यावर आज सर्वपक्षीय आंदोलन केले आहे.

मावळातील स्थानिक नागरिकांसाठी हा टोल बंद होईल अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने हा टोल बंद न करता टोलसाठी 11 वर्ष मुदतवाढ दिली. हा नागरिकांवरील अन्याय आहे. शासनाने लवकरात लवकर टोलमाफी करावी.

तसेच टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबत आयआरबी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जाते. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने येथील टोल वसुली बंद करावी, असे समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे म्हणाल्या.

भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते अमोल शेटे म्हणाले, 2005 साली हा टोलनाका सुरू झाला. आजपर्यंत सर्व मावळवासीय या टोलनाक्यावर टोल देत आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता स्थानिक नागरिकांना टोल माफी करावी; अन्यथा मावळातील नागरिकांकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

याप्रसंगी अनिता पवार, निखिल भगत, सुनील कारंडे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, अनिल पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.