Pune News: ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल : सतेज पाटील

एमपीसी न्यूज : “भारत हा तरुणांचा देश असून, या तरुणाईला सक्षम बनविण्यात काँग्रेस पक्षाने कायमच पुढाकार घेतला आहे. आदरणीय श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेला ‘सोनिया शक्ती’ शिष्यवृत्तीचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देईल. याच मदतीची जाणीव ठेवून भविष्यात इतर गरजूना मदतीची भावना तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी,” असे मत माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून ७६ गरजू मुलींना ‘सोनिया शक्ती’ शालेय साहित्य शिष्यवृत्तीचे, तसेच बळीराम डोळे व इम्रान शेख यांच्या पुढाकारातून पोलीस भरतीतील १४० विद्यार्थ्यांना ९० हजारांचे साहाय्य सतेज पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

Pune News : ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन

बालगंधर्व कलादालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, सत्संग मुंडे, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, आयुब पठाण, रोहन सुरवसे, सौरभ अमराळे, पुष्कर आबनावे, प्रवीण करपे, बळीराम डोळे, कान्होजी जेधे आदी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, “कर्तृत्ववान नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे मोठे काम मोहन जोशी यांनी केले. एकनिष्ठतेचे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिले आहे. अभ्यासात, नोकरी-व्यवसायामध्ये एकनिष्ठता जपली पाहिजे. ‘भारत जोडो’ यात्रा पक्षाची नव्हे; तर देशाची आहे. जात, धर्मविरहित मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यासाठी राहुल गांधी चालत आहेत. यातून प्रेमाचे, आपुलकीचे वातावरण तयार होईल. राज्यघटनेने सर्वसामान्यांना समान अधिकार दिले, त्याचे पालन व्हावे. राज्यघटनेच्या संरक्षणासाठी आपण प्रत्येकाने काम केले पाहिजे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “दर महिन्याला ७६ याप्रमाणे वर्षात ७६० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. देशातील महिला वर्ग ही खरी शक्ती असून, महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना सक्षम करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे.”

रमेश बागवे म्हणाले, “तरुणांना, महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस पक्षाने आजवर केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेसच्या माध्यमातून भारत एकसंध राहावा, सामाजिक ऐक्य जपावे यासाठी प्रयत्न करत आहेत.” अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. चेतन अगरवाल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.