Spin legend Shane Warne passes away : अलविदा चॅम्प

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : सोशल मीडियावर आमदिन अनेक सेलिब्रिटींना अधून मधून श्रद्धांजली वाहिली जातेच. काल तसेच एका ग्रुपवर ती अविश्वसनीय बातमी आणि पाठोपाठ rip/भावपूर्ण श्रद्धांजलीच्या अगणित पोस्ट वाचण्यात आल्या, तरीही विश्वास बसेना, मग टीव्ही लावला तर दुर्दैवाने तिथेही तीच बातमी होती.

मनाला पटत नव्हते, डोळ्याला दिसत नव्हते तरीही सत्य हेच होते की मैदानावर आणि मैदानाबाहेरही कायम चर्चेत असलेला ऑस्ट्रेलियन सार्वकालीन महान (आमच्या काळातला तरी) लेगस्पिनर आणि फिरकीचा महान जादूगार शेन वॉर्न ही दुनिया सोडून गेला आहे.

काल थायलंड येथील त्याच्या बंगल्यात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचे दुःखद निधन झाले, वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी!

जगातल्या एकाहून एक श्रेष्ठ फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणाऱ्या या महान गोलंदाजाला स्वर्गातल्या त्या आणखी एका जादूगाराने टाकलेल्या अकाली आणि अफलातून चेंडूने इहलोकीवरच्या जादूगाराचा खेळ कायमस्वरूपी खल्लास केला आणि मी एकमेव खराखुरा महान जादूगार आहे हेच सिद्ध करून दाखवले.

13 सप्टेंबर 1969 रोजी ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या शेन वॉर्नचे आयुष्य अतिशय रंजक राहिलेले आहे, मैदानावर तो जितका चर्चेत असे त्याहूनही कितीतरी जास्त तो मैदानाबाहेरही चर्चेत होता, वादग्रस्त होता. मग ते त्याचे बेफाम धूम्रपान असो की, त्याचे विवाहबाह्य संबंध असो की, त्याच्यावर झालेले बेछूट आरोप असोत, त्याचे आयुष्य कायमस्वरूपी वादग्रस्तच राहिले.

सचिन तेंडुलकरवर आणि भारतावर प्रचंड प्रेम करणारा शेन वॉर्न भारतीय क्रिकेट रसिकांना कायमच आवडत असे. या विदेशी खेळाडूंना एक नक्कीच कळते, भले ते क्रिकेट खेळत असताना मैदानावर कितीही अखिलाडूवृत्ती दाखवोत, पण यांना भारतीय क्रिकेट रसिकांना कसे आपलेसे करायचे याचे गणित पक्के समजलेले असते, म्हणूनच माझ्या स्वप्नात तेंडुलकर येतो, असे जेंव्हा तो म्हणाला होता, तेंव्हा प्रत्येक भारतीयांचा उर भरून आला होता.

क्रिकेटचे खरेखुरे दैवत डॉन ब्रॅडमन यांना भेटण्यासाठी जेंव्हा सचिन त्यांच्या मेलबर्न येथील घरी गेला होता, तेंव्हा त्याच्या बरोबर होता तो शेन वॉर्नच.

भारतीय संघाविरुद्धच त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पदार्पण 2 जानेवारी 1992 रोजी सिडने येथे झाले होते, अर्थात त्या सामन्यातली त्याची कामगिरी जराही लक्षवेधी नव्हती, पण त्यानंतरच्या अगदी काहीच कालावधीत त्याने आपले नुसते नावच प्रसिद्ध केले नाही तर चक्क आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता.

तब्बल 25  वर्षे आपल्या फिरकीच्या जोरावर जगभरातल्या फलंदाजांना थयथय नाचवणाऱ्या त्याच्या गोलंदाजीने अविस्मरणीय कामगिरी करूनच निवृत्ती घेतली होती.

145 कसोटी सामन्यात 708 तर 199 एकदिवशीय सामन्यात 293 विकेटस त्याच्या नावावर जमा आहेत.1 हजाराहून अधिक विकेट्स आणि फलंदाजीमध्ये 4 हजाराहून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

माईक गॅटिंग या इंग्लंडच्या महान फलंदाजाच्या चिपळ्या उडवणाऱ्या त्याच्या त्या चेंडूला या दशकातला सर्वोत्तम चेंडू मानले गेले. तो चपळ क्षेत्ररक्षणासाठी तर प्रसिद्ध होताच, पण तो उपयुक्त फलंदाजीही करत असे, म्हणूनच त्याच्या नावावर चार हजारांहून अधिक धावाही आहेत.

सिमोन या त्याच्या पत्नीबरोबर 1995 साली लग्नाची गाठ बांधलेल्या शेन वॉर्नला तीन मुले आहेत, पण स्वैर वागणुकीमुळे बदनाम असलेल्या शेनने तिला 2005 साली घटस्फोट दिला होता. इंग्लंडमध्ये एका ललनेबरोबर असलेले त्याचे विवाहबाह्य संबंध या घटस्फोटासाठी कारणीभूत होते, असे त्यावेळी बोलले गेले.

निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स कडून खेळला आणि आपल्या नेतृत्वाखाली त्याने या संघाला विजेतेपदही मिळवून दिले. आपल्या देशाकडून खेळताना त्याने नेतृत्व करण्याची इच्छा कैकदा जाहीर बोलून दाखवलीही होती, पण त्याला ती संधी कधीही मिळाली नाही, याचे दुःख त्याला कायम होते.

2007 साली मायदेशी झालेल्या एशेस सिरीजमध्ये इंग्लिश संघाला दणदणीत पराभूत केल्यानंतर शेन वॉर्नने शानदाररित्या आपली निवृत्ती घोषित केली होती. त्यावेळीही त्याने त्या मालिकेत सर्वात जास्त बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलिया सोडून तो इतर कुठल्याही आशियाई संघात असता तर विक्रमासाठी पुढील कित्येक वर्षे खेळत राहिलाही असता.

सलग तीन वर्षे हाम्पशायरचा कर्णधार, विस्डेनचा 2000 साली तो या शतकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आला होता. अशा काही अविस्मरणीय गौरवास्पद क्षणाचा मानकरी असणाऱ्या शेन वॉर्न 4 मार्च 2022 रोजी थायलंड येथील त्याच्या बंगल्यात असताना इहलोकीची यात्रा सोडून अंतिम प्रवासाला पुन्हा इथे कधीही न येण्यासाठी निघून गेला आहे.

वैयक्तिक आयुष्यात काहीही असले तरी तो मैदानावर असताना मात्र एक जबरदस्त खेळाडू आणि महान खेळाडू म्हणून जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहणारा वॉर्नी आता या जगात नाही हेच खरे आहे.

तू एक अवलिया होतास वॉर्नी, म्हणूनच तू आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहशील, तुझ्या अखेरच्या प्रवासासाठी अलविदा चॅम्पियन 😢😢💐💐💐

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.