Pimpri News: भाजपला श्रेयाची घाई, राजशिष्टाचार पाळण्याबाबत आयुक्तांनी घ्यावी खबरदारी – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली राजशिष्टाचाराचे पालन न करता केले जाते. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून होणा-या कोणत्याही कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करून राजशिष्टाचाराचे पालन करावे. सत्ताधा-यांना श्रेय घेण्याची घाई झालेली आहे. परंतु, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ही खबरदारी घ्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडच्या नागरिकांनी सत्ता दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पाच वर्षे शहराकडे दुर्लक्ष केले. शहराच्या विकासकामांसाठी आणि शहरवासीयांसाठी त्यांच्या नेत्यांना शहराची वाट दिसली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना शहरात बोलावून दिखावा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांचा सुरू आहे. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते पुणे शहरात येणार असल्याने त्यांना शहरात बोलावून कामांचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याची तयारी सुरू आहे. परंतु, महापालिकेचे प्रशासकीय कार्यक्रमाचे नियोजन करत असताना राजशिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक आहे. सत्तेच्या मस्तीमध्ये आकंठ बुडालेल्या भाजपच्या पदाधिका-यांना त्याचे भान राहिलेले नाही.

या पूर्वी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या दबावाखाली प्रशासनाने राजशिष्टाचाराचे पालन न केल्याचे प्रकार घडले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने वारंवार भूमिका मांडून निषेध केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमासाठी राजशिष्टाचाराचे पालन करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करावे. सन्मानीय पालकमंत्री महोदयांचा अनादर होणार नाही. याची खबरदारी महापालिका प्रशासन व आयुक्त राजेश पाटील यांनी घ्यावी. तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा या कार्यक्रमाला विरोध करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.