Srujan Nritya Mahotsav : तळेगावच्या सृजन नृत्यालयाच्या रौप्यमहोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याची आवड रुजावी यासाठी गेली 25 हून अधिक वर्षे  सृजन नृत्यालय कार्यरत आहे. आपल्या कार्यातून मावळच्या सांस्कृतिक चळवळीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सृजन नृत्यालयाचा रौप्यमहोत्सवाचे (Srujan Nritya Mahotsav) काल (शनिवारी) दिमाखात उद्घाटन झाले.

या प्रसंगी गुरु डॉ. स्वातीताई दैठणकर (संगीताचार्य भरतनाट्यम्), प्रसिद्ध चित्रकार रवी देव (संस्कार भारतीचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य), डॉ. लक्ष्मी पंडीतधर (Ph. D  भरतनाट्यम् ) तसेच कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर व साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर हे मान्यवर रंगमंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लीना परगी यांनी गायलेल्या श्लोकाने झाली. मान्यवरांच्या हस्ते सृजन नृत्यालयाच्या (Srujan Nritya Mahotsav) वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले आणि  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Om Birla : देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात अग्रवाल समाजाचे मोठे योगदान – ओम बिर्ला

सुरुवातीस  भरत नाट्यम मधील पारंपारिक रचना पुष्पांजली सादर करण्यात आली ही रचना बसंत रागातील आणि खंडचापू तालातील रचना डॉ.मीनल कुलकर्णी यांची होती.

त्यानंतर आदी देव नमोस्तुभ्यं प्रसाद मम भास्कर: ही सांब पुराणातील सूर्याष्टकम ही नेत्रदीपक रचना सादर करण्यात आली. त्यानंतर महर्षी शिवभक्त पतंजली च्या शंभूनटनम स्तोत्रावर आधारित रचना  तसेच गणेश ,देवी आणि शंकर यांची स्तोत्रे एकत्रित असणारी स्तोत्रांजली सादर करण्यात आली, नृत्यरचना डॉ.मीनलताईंची शिष्या शरयू पवनीकरची होती.

एका पेक्षा एक सुंदर अश्या या रचनांना मिळणारी रसिकांची उत्स्फूर्त दाद कार्यक्रमाची रंगत वाढविणारी होती. सृजन नृत्यालयाचा कलाप्रवास व भविष्यातील वाटचाल  दृक्श्राव्य चित्र फिती द्वारा दाखविण्यात आली.

या नंतर मान्यवरांच्या हस्ते सृजन नृत्यालयाच्या (Srujan Nritya Mahotsav) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे व ‘साप्ताहिक अंबर’च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन झाले.

कलापिनी, श्रीरंग कलानिकेतन आणि तळेगावात भरतनाट्यमचे प्रशिक्षण देणारे उज्ज्वल भोळे यांच्या वारसांचा गौरव करण्यात आला.

भरतनाट्यम् नृत्य शैलीचे परिपूर्ण शिक्षण देऊन उत्तम कलाकार तयार करणे हे नृत्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट तर आहेच , पण त्याच बरोबर शास्त्रीय नृत्यासाठीचा दर्जेदार रसिकवर्ग  निर्माण करणे हे ही आपले कर्तव्य आहे या धारणेतून सृजन नृत्ययालयाने आज पर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम व नृत्य नाट्ये यांची निर्मिती केली आहे, असे सृजन नृत्यालयाच्या (Srujan Nritya Mahotsav) संचालिका डॉ.मीनल कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

सृजन नृत्यालयाला शुभेच्छा देताना डॉ.अनंत परांजपे यांनी डॉ.मीनल च्या कलागुणांचे आणि संघटन कौशल्याचे कौतुक केले तर सुरेश साखवळकर यांनी सृजन नृत्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“गुरुकृपे विना ज्ञानप्राप्ती नाही. शिकण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत चालूच रहाते” असे मनोगत नृत्याच्या अभ्यासिका डॉ.लक्ष्मी पंडितधर यांनी व्यक्त केले.

“एखाद्या कलाकारच्या मागे सगळा गाव उभा राहिल्या नंतरच असा महोत्सव होऊ शकतो. गुरु शिष्यपरंपरा ही भारतीय संस्कृती कडून जगाला मिळालेली देणगी आहे. योग ही एकांतात करायची साधना आहे तर नृत्य हा लोकांतात करायचा योग आहे” असे डॉ.मीनल कुलकर्णी यांच्या गुरु डॉ.स्वाती दैठणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

भारतीय कला या आपल्या जीवनाशी जोडलेल्या आहेत आणि  कलाकार हे पण करोनाचे योध्दे आहेत असे अध्यक्षीय मनोगत , प्रसिद्ध चित्रकार रवी देव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतले सूत्रसंचालन मकरंद जोशी यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

आभार प्रदर्शनात दिनेश कुलकर्णी यांनी या महोत्सवासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाचा उल्लेख केला.

मावळच्या सांस्कृतिक क्षेत्रात अश्या प्रकारचा पाच दिवसांचा उत्सव प्रथमच होत असल्याने रसिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रम (Srujan Nritya Mahotsav) यशस्वी होण्यासाठी सृजन नृत्यालय आणि कलापिनी परिवारातील कलाकार,पालक आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

हे अनादी हे अनंता…..तू आम्हा वरदान दे साधकाची वृत्ती दे…शोधकाची जाण दे….या दिनेश कुलकर्णी रचित आणि विनायक लिमये यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि डॉ. सावनी परगी यांनी गायलेल्या गीताने समारंभाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.