Talegaon Dabhade : येत्या आठ दिवसात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत होणार

एमपीसी न्यूज – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहेत. तळेगाव दाभाडे एसटी आगारातील लांब पल्ल्याची बस सेवा सुरू झाली आहे. तसेच येत्या आठ दिवसात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातही लाल परीची पुन्हा सेवा सुरू होणार आहे. यामुळे तळेगाव दाभाडे परिसरातून राज्यातील विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मावळ तालुक्यात अंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगाव एसटी बस आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगारातून लांब पल्ल्याच्या एसटी बसची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीची सेवा पूर्ववत सुरू होईल, प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा असे आवाहन तळेगाव एसटी बस आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे.

गेल्या 8 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी संप असल्याने सर्व ठिकाणच्या एसटी प्रवासी गाड्या बंद होत्या.तळेगाव आगरामध्ये एकूण चालक 84, वाहक 68,  कार्यशाळा कर्मचारी 27, तसेच कार्यालयीन कर्मचारी 11 असून इतर 10 ही संख्या आहे.

यामध्ये (दि 15) रोजी 16 चालक, 18 वाहक, 6 कार्यशाळा कर्मचारी तर 8 कार्यालयीन कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे अक्कलकोट, बार्शी, बीड, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासी बस सुरू केल्या असून लवकरच कामगारांच्या उपस्थितीनुसार स्थानिक पातळी वरील प्रवासी बस वाहतूक सुरू करण्यात येईल अशी माहिती धायतोंडे यांनी दिली.

एप्रिल अखेर पर्यंत सर्व कर्मचारी हजर होतील. स्थानिक आणि उर्वरित लांब पल्ल्याच्या बसगाड्या धावतील, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी एसटी गाड्यांचा वापर करावा असे आवाहन धायतोंडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.