Pimpri: ‘वायसीएमएच्‌’ मध्ये मानसोपचार विभाग सुरु 

एमपीसी न्यूज – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच्) नव्याने मानसोपचार विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. स्मिता पानसे, पद्माकर पंडीत उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, ‘शहरातील मानसोपचार रुग्णांवर इतर रुग्णालयात उपचार केले जात होते. यामुळे, रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, मानसिक रुग्णांसाठी वायसीएमएच्‌ रुग्णालयात नव्याने विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. महापालिकेतर्फे रुग्णांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे’.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘शहरातील महापालिकेची बहुतांशी रुग्णालये सोई-सुविधांनी सुसज्ज केली जाणार आहेत. महापालिकेच्या रुग्णांना वेळेत व आवश्‍यक सुविधा देण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांनीही महापालिकेच्या रुग्णालयातील सुविधेचा लाभ घेण्याची गरज आहे’.

डॉ. जाधव म्हणाले, ‘वायसीएम रुग्णालयात मानसोपचार रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, या रुग्णांसाठी विशेष विभाग तयार करण्यात आलेला नव्हता. वायसीएममध्ये नव्याने सुरु केलेल्या विभागाने रुग्णांना पुण्यात अथवा इतरत्र न जाता शहरातच उपचाराची सोय होणार आहे. या रुग्णालयातील मानसोपचार विभागात सध्या 6 खाटा उपलब्ध असून टप्या-टप्प्याने 30 खाटांची क्षमता केली जाणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.