Maharashtra : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून

एमपीसी न्यूज : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, (Maharashtra) महाराष्ट्राच्या हातून गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजणार आहे. 

विरोधकांच्या हाती एवढे मुद्दे असल्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारची या अधिवेशनात अक्षरशः कसोटी लागेल. काल महामोर्चा काढून मविआने आक्रमक संकेत दिलेत. आज मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे नागपूरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होऊ शकलं नाही.

Minority Committee : जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती तात्काळ पुनर्गठित करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर येथे 19 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक अधिक आक्रमक होणार आहेत. कालच मुंबईत महाविकास आघाडीने मोठा मोर्चा काढला होता. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशेषत: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता वेदांत फॉक्सकॉन, ऊर्जा उपकरणे निर्मिती प्रकल्प, टाटा एअरबस प्रकल्प आदींसह राज्यातील प्रस्तावित उद्योग गुजरातमध्ये पळविण्यात आलेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदींबद्दल अवमानकारक वक्तव्ये यावरुन राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांनी केंद्र सरकारने पदावरुन हटवावे, अशी विरोधकांनी मागणी केली आहे. हा मुद्दा अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही विरोधकांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास आणि मुंबईतील पत्रा चाळ कथित प्रकरणी खासदार संजय राऊत यांना झालेली अटक हा मुद्दा आणि कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

19 ते 29 डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे. नागपुरात अधिवेशनाची जय्यत तयारी झालीय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यावर्षी अधिवेशन काळात तब्बल 61 मोर्चे काढले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.