Pimpri : राज्यातील महापौरांना हवाय मोटारीवर ‘अंबर’ दिवा अन अधिकारांमध्ये वाढ 

पनवेल येथील 17 व्या महापौर परिषदेत मागणी; पिंपरीचे महापौर जाधव यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज – शहराच्या दृष्टीने महापौरपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्या तुलनेत महापौरांना अधिकार कमी आहेत. महापौर निधी देखील कमी आहे. त्यामुळे महापौरांच्या अधिकारात आणि निधीत वाढ करावी. मोटारीवर ‘अंबर’ दिवा असावा, अशी एकमुखी मागणी राज्यातील महापौरांनी परिषदेत केली.

राज्यातील महापौरांच्या पनवेल येथे आज (शनिवारी) पार पडलेल्या 17 व्या परिषदेत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. या परिषदेला पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित होते. महापौरपदी निवड झाल्यानिमित्त जाधव यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी, त्यात महापौरांना विविध स्वरुपाचे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार मिळावेत, प्रसंगी गरजेनुसार अधिनियमात दुरुस्ती करणे तसेच महापालिका परिसरातील, शहराच्या दृष्टीने अन्य अनुषंगिक अडचणी एकसंधपणे राज्य शासनाकडे सादर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातल्या एकूण सर्व 27 महापालिकांच्या महापौरांची परिषद स्थापन झाली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर हे या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या महापौर परिषदेची 17 वी बैठक आज (शनिवारी) पनवेल येथे संपन्न झाली.

बैठकीस महाराष्ट्रातल्या बहुतांश महापालिकांचे महापौर उपस्थित होते. त्यावेळी अधिनियमांत महापौरांना कोणत्याही आर्थिक स्वरुपाच्या अधिकारांची तरतूद नसल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर जाधव यांनी महापालिकेच्या महापौरांना आर्थिक स्वरुपाचे अधिकार देणे. तसेच  त्या धर्तीवर सुविधा देण्याबाबतचे विषय बैठकीसमोर मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.