Bhosari : विद्यार्थ्यांनी शिक्षक, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – महापौर जाधव

 भोसरीत पालिकेतर्फे गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज – आई-वडील व शिक्षकांच्या कष्टाची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून आपला यशाचा आलेख उंचीवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी येथे आज (बुधवारी) महापालिकेच्या विद्यालयातून शालांत परिक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, कार्यालयीन अधिक्षक सोमा आंबवणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे एकुण 20 विद्यार्थी आहेत. ही संख्या पुढील वर्षी दुप्पट झाली पाहीजे. त्या करीता शिक्षकांनी जास्त – मेहनत घ्यावी. कारण शहराचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात आहे. विद्यार्थ्यानी आई – वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. ज्याप्रमाणे दहावीत यश प्राप्त केले आहे. त्याप्रमाणे बारावी व त्यानंतरच्या उच्च शिक्षणातही अशाच प्रकारचे सातत्य ठेवा. अडचणी आल्यातरी निराश होऊ नका. अभ्यासात दुर्लक्ष व टाळाटाळ करु नका. वाम मार्ग स्वीकारु नका. तुमच्या उज्वल भविष्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तुमच्या पाठिशी उभी राहील.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, आपले महापौर व मी जिल्हा परिषेदेच्या व महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषेदेच्या शाळेत शिक्षण घेऊन राहुल जाधव हे महापौर झाले आहेत. त्याच प्रमाणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन अनेक विदयार्थी आयएएस झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांना व विदयार्थ्याना महापालिकेमार्फत सोयी सुविधा मोठया प्रमाणात दिल्या जाणार आहेत. परंतु, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सर्वानी केला पाहिजे.

यावेळी 12 दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देवून सन्मान करण्यात आला. 90 ते 100 टक्के पर्यंत गुण प्राप्त केलेल्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 20  लाख रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. त्यामध्ये कैन्हयाकुमार झा, रोशन सोनवणे, सुचिता पुजारी, आयेशा पठाण, मसीरा शेख, काजल लवटे, भाग्यश्री शिंदे, अनिश पोवार, आकांशा काटे, आश्विनी नरळे, ओंकार चव्हाण, कृष्णा धोकटे, यश बाबर, समर्थ पानसरे, सुनिल राठोड, ईशा मखीजा, सोनाली आसवले, अमित शेळके, मोनिका बोरकर, सना शहा यांचा समावेश होता.

माध्यमिक शालांत परिक्षेत 85 ते 89.99 टक्के गुण प्राप्त केलेल्या एकूण 34 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यात आले. तर 80 ते 84.99 टक्के गुण प्राप्त करणा-या एकूण 60 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी केले. तर सूत्रसंचालन नरेंद्र बंड यांनी केले. आभार नंदिनी बांदल यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.