Sunil Gavaskar’s 50 years career tribute : क्रिकेट मधला मोठा ख्यालीया सुनील गावस्कर

एमपीसी न्यूज :( पंडित विनोदभूषण आल्पे)  सुनील गावस्कर आणि मी जवळ जवळ एकाच वेळी क्रिकेट खेळू लागलो, तो ग्रँट रोड च्या चिखलवाडी मध्ये आणि मी गिरगावातल्या दुभाष लेन मध्ये परंतु क्रिकेट मधल्या टाईमिंग पेक्षा शास्त्रीय संगीतातील टाईमिंग मध्ये मी जास्त तरबेज असल्याचे जाणवल्यावर हळूहळू माझा क्रिकेट चा नाद कमी कमी होत गेला ,त्यातूनच त्या काळात क्रिकेट खेळायला अख्खा दिवस वाडीत पडून असल्याच पाहिल्यावर आमच्या मातोश्री एक दिवशी एवढ्या भडकल्या की त्यांनी माझी बॅट पाणी तापवायच्या बंबात टाकून दिली .

दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी तापवायला बंब पेटवल्यावर अचानक घर भर प्रचंड धूर झाला तेव्हा घरातले सगळे हादरले ,”आज एवढा धूर का होतोय” हे आईच वाक्य साखर झोपेत असलेल्या मला ऐकू आल आणि , मी बोंबलत च उठलो , “अगं माझी बॅट”! तेव्हा कुठे आई ला आठवले की आपण च ती बॅट बंबात घातली होती . त्या दिवशी च्या त्या धूरात च माझ क्रिकेट कधी विरून गेले ते मला कळलं च नाही , आणि भारत सुनील बरोबरच्या एका सलामीवीराला मुकला !!!!

गमतीचा भाग सोडा , पण , त्या वेळी वृत्तपत्रात आठवड्याला “सुनील गावस्कर चे शतक” हा मथळा एक दोन दा तरी झळकत असे , तो त्यांनी कायमचाच कंपोज करून ठेवला होता की काय , कोण जाणे ? कदाचित वयाने बरोबरीचा असल्याने आम्ही त्या मथळ्याकडे थोडेसे आसुयेने च पाहत असू ,आणि मनाशी म्हणत असू की आता हा धडा धडा सेञ्चुर्‍या मारेल नि टेस्ट मध्ये घेतल्यावर बोंब .. कारण बर्‍याच जणांच्या बाबतीत दुर्दैवाने त्या काळात तो अनुभव येत असे , पण ! पुढे तो वेस्टइंडिज ला गेला आणि सलामीच्या चार सामन्यात च ७७४ धावा कूटून आला .

तेव्हा मात्र आम्ही चक्रावलो आणि याला आता पर्यन्त का पाहिला नाही ? या बद्दल पस्तावलो . मग मात्र टीवि वरची एक ही खेळी कधी चुकवली नाही आणि तो तिशी च्या पुढे गेल्यावर ऑफिस ची बॅग कोपर्‍यात फेकून देऊन त्याची सेंचुरी बघण्यासाठी मांडा ठोकून बसत असू आणि तो बर्‍याच वेळेला निराश करत नसे .. माझ्या अश्या अनेक सुट्ट्या सुनील साठी कुरबान झाल्या ,

ते असो !!! अश्या या महाभागाला कधी प्रत्यक्ष भेटायला मिळेल अस वाटलं नव्हतं , नाही म्हणायला वानखेडे वर वेस्ट इंडिज च्या टेस्ट मॅच च्या आदल्या संध्याकाळी सहज फेर फटका मारायला गेलेलो असताना वानखेड्यांचेच पी ए श्री , यंदे भेटले , जे माझ्या गाण्याचे चाहते होते , त्यांनी मला पाहिले , नि ते म्हणाले , काय आज इकडे कुठे ? तर मी म्हणालो सहजच नेट प्रॅक्टिस बघायला आलोय,

अस आमच बोलणं सुरू असताना च समोरून साक्षात सुनील च येताना दिसला , जवळ आल्यावर त्यांनी यंदे न कडे पाहून स्मित केले ,तेव्हा मी एकदम न राहून त्याला म्हणालो ,काय मग उद्या सेंचुरी का ? तो हसला आणि म्हणाला , बघूया , पाऊस पडून गेलाय बघताय ना ! मी ही हसलो ,आणि सांगायच म्हणजे दुसर्‍या दिवशी टॉस जिंकून बॅटिंग आल्यावर सुनील ने २२० मारल्या , तेव्हापासून तर मी त्याचा भक्त च झालो ..

मी एक शास्त्रीय गायक असल्याने त्याच्या मोठ्या खेळीत मला एखाद्या मोठ्या ख्यालीयाच्या गायकीची बढत दिसत असे , तो गायक सुरवातीला संथ आलापी करताना आपल्या गळ्याच्या तयारीची सुतराम कल्पना येऊ देत नाही , मी एकदा आवाज लागल्यावर ज्या प्रमाणे लयकारीची आणि तानांची धमाल उडवून देतो तीच बढत मला त्याच्या खेळात दिसत असे , किंबहुना मी स्वता ख्याल गाताना त्याच्या फलंदाजी ची आठवण मला कधी कधी येते ..

सुनील च्या डेब्यु ला ५० वर्ष झाली त्या सत्काराच्या वेळी मला त्याची प्रत्यक्ष भेटीची आणि संवादाची आठवण झाली वान्द्र्याच्या एका क्लब वर एका सत्काराला मी निमंत्रित होतो तो कार्यक्रम झाल्यावर पार्टी मध्ये वावरत असताना मी त्याला पाहिले आणि त्याच्याशी बोलण्याचा मोह मला अनावर झाला , पण ओळख नसताना बोलणार ते काय ? तेवढ्यात मला त्याने रणजी ट्रॉफी मध्ये मारलेल्या त्रीशतकाची आठवण एका स्पोर्ट्स मासिकात पाहिलेला त्याचा फोटो आणि त्या वर चा मथळा तिशी नंतरचे त्रीशतक हा आठवला , नि मला सुचले ,

मी सरळ गेलो आणि त्याचाशी हस्तांदोलन करत म्हणालो “congratulations Sunil for your 340 s even after your 30’s ! माझ्या या उदगाराने सुनील खळखळून हसला आणि म्हणाला “मी काही दमलो नव्हतो , पण माझ्या एकाग्रतेत काही तरी अडथळा आल्याने मी बाद झालो आणि त्या नंतर त्याने ज्या स्टेडियम वर आपण खेळत असतो तिथल्या भौगोलिक स्थिति चा वातावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन खेळताना धोरण कस आखाव लागत , मला जवळजवळ 10 एक मिनिट त्याचे विचार ऐकवले .तेव्हा मी अक्षरशा चाट झालो .क्रिकेट मधला एक महामानव च ! मला भेटला या आनंदातच मी घरी परतलो ….

त्याला दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी लाख लाख शुभेच्छा ,आणि त्याच्या क्रिकेट प्रतिभेला साष्टांग दंडवत ……………!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.