Sushant Singh Rajput’s Movies: चित्रपटात विविधरंगी भूमिका साकारणारा प्रतिभावान सुशांत

Sushant Singh Rajput's Movie Journey इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यात मन न रमल्याने नृत्याच्या ओढीने सुशांत मुंबईत डान्स डायरेक्टर शामक दावर यांच्या अकादमीत दाखल झाला.

एमपीसी न्यूज- चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आज राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या फक्त ३४ वर्षी हा टोकाचा निर्णय घेताना मागील काही दिवसांपासून तो डिप्रेशनवर उपचार घेत होता असे पुढे आले आहे. आपल्या या छोट्या आयुष्यात सुशांतने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय केला.

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यात मन न रमल्याने नृत्याच्या ओढीने सुशांत मुंबईत डान्स डायरेक्टर शामक दावर यांच्या अकादमीत दाखल झाला.

नृत्याच्या माध्यमातून अनेक शोमध्ये सहभाग घेतला. २००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतर त्याला खरी संधी मिळाली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. नंतर ‘झलक दिख ला जा’या डान्स शोमध्ये त्याने आपल्यातील नृत्य आणि अभिनयाची चमक दाखवून दिली होती.

पवित्र रिश्ता मालिका गाजल्यानंतर सुशांतला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केले.

‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटांनी त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. सारा अली खानबरोबरच्या ‘केदारनाथ’ने देखील त्याच्यातील अभिनेत्याचा कस पाहिला.

करण जोहर निर्मित ‘ड्राइव्ह’ हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला आहे. ‘ड्राइव्ह’ या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने काम केले.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित न करता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत होते.

कदाचित त्याचे देखील दडपण सुशांतवर असावे असे बोलले जात आहे. पण चित्रपट सुशांतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला आहे.

सुशांतचा ‘छिछोरे’ हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट अखेरचा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट महाविद्यालयीन मैत्री तेही आयआयटीतले वातावरण, त्यातही वसतिगृहातील राहणे, त्या आठवणी यावर बेतलेला आहे.

तसेच या चित्रपटात सुशांतने मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलांना सावरण्यासाठी लूजर काय असतात हे सांगितले आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल २९.७८ कोटी रुपयांची कमाई केली होती.

मात्र ‘छिछोरे’ मध्ये ताणतणावातून कसे बाहेर यावे याचा उपदेश करणारा सुशांत वैयक्तिक आयुष्यात या तणावांना सामोरे जायला कुठेतरी कमी पडला असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.