T20 WC 2021 Final: कर्णधार केन विल्यम्सनच्या जबरदस्त फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले 173 धावांचे लक्ष्य!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतरही फलंदाजीवर विश्वास ठेवत संथ सुरुवात झाल्यावर सुद्धा नंतर जबरदस्त फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघापुढे विश्वकप जिंकण्यासाठी 173  धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

दुबईच्या अलिशान मैदानावर 20/20च्या अंतिम सामन्याला आज सुरुवात झाली आणि न्यूझीलंड संघाने चांगली आणि अंतिम सामन्यातली आजवरची सर्वोच्च धावसंख्या करत आपल्या पहिल्यावहिल्या 20/20 विश्वकप विजेतेपदाची अपेक्षा जिवंत ठेवली.

अखेर तो दिवस उजाडलाच, अनेक गोष्टीमुळे लांबत गेलेल्या 20/20 वर्ल्डकपला यावर्षी सुरुवात झाली, आणि बघताबघता आज त्याचा अंतिम सामना सुद्धा  आला. अनेक भाकिते, भविष्यवाणी खोट्या ठरवत मोठमोठ्या संघाना धक्के देत केन विलीएम्सनच्या न्यूझीलंड संघाने आणि अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

शेजारी राष्ट्र असलेल्या या संघात नेहमीच चुरशीच्या लढती झाल्या खऱ्या,पण 20/20 मधील अंतिम फेरीच्या सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडत होते,ऑस्ट्रेलिया याआधी एकदा 2010 मध्ये पोहचले होते, पण त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती, ती हुकलेली संधी ते आज भरून काढणार की न्यूझीलंड संघ आपले पहिले विश्वविजेतेपद पटकवणार याकडे समस्त क्रिकेटविश्वाचे लक्ष्य लागून राहिले होते.

या महत्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि क्षणात अरॉन फिंचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला. कारण दुबईच्या या मैदानावर आतापर्यंत झालेल्या बारा सामन्यात 11 वेळा दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ जिंकला होता, तर एकमेव विजय न्यूझीलंडच्या खात्यावर होता, जो त्यांनी नामीबिया संघाविरुद्ध मिळवला होता.

उपांत्यफेरीत झुंजार खेळ करून संघाला विजय मिळवून देणारा कॉन्व्हे आज दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. त्याच्या जागी टीम सिफर्ट आला तर ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या अखेरच्या विजयी संघात काहीही बदल केला नाही.

किवी संघाच्या डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे मार्टिन गुप्टील व मिशेल  यांनी तर ऑस्ट्रेलियन आक्रमकाची सुरुवात डावखुऱ्या मिशेल स्टार्क ने केली.पहिल्याच षटकात न्यूझीलंड  संघाने नऊ धावा काढत सुरुवात तर चांगली केली. पण किवी संघाच्या 28 धावा झाल्या असताना हेजलवूडने मिचेलला यष्टीमागे वेडच्या हातून वैयक्तिक 11 धावांवर बाद करून ऑस्ट्रेलिया संघाला पहिले यश मिळवून दिले.

त्याच्या जागी कर्णधार केन विल्यम्सन खेळायला आला.मात्र या जोडीला धावा जलदगतीने करता येत नव्हत्या, त्यामुळेच पहिल्या दहा षटकात केवळ 59 धावाच धावफलकावर लागल्या होत्या.अखेर 48धावांची भागीदारी झाल्यानंतर मार्टिन गुप्टील झंपाने बाद करून ही जोडी फोडली.

तो 35 चेंडूत 28 धावा काढुन बाद झाला.मात्र दुसऱ्या बाजूने जम बसलेल्या केनने नंतर मात्र आक्रमक अंदाजात खेळत आपली या वर्ल्डकप मधली पहिली अर्धशतकी खेळी केवळ 31 चेंडूत पूर्ण केली.त्याने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन षटकार मारत ही ऐतिहासिक कामगिरी केली.

ही अंतिम सामन्यातील आजपर्यंतची सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली आहे. त्यामुळेच 14 व्या षटकात न्यूझीलंड संघाच्या 100 धावा पूर्ण होऊ शकल्या. पहिल्या दहा षटकात 57 धावा आल्यानंतर नंतरच्या 5 षटकात 57 धावा आल्या होत्या.

आता उरलेल्या पाच षटकात किवी संघ किती धावा जमवून ऑस्ट्रेलिया संघाला कितीचे लक्ष्य देणार याची उत्सुकता सर्वाना होतीच.आणि मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजावर डावाच्या 16 व्या षटकात केनने 22 धावा काढून ऑस्ट्रेलियन संघात एकच खळबळ उडवून दिली.

त्याच्या हल्ल्यात ऑस्ट्रेलिया संघ पुरता लुटला जाईल असे वाटत असतानाच हेजलवूडने एकाच षटकात केन विल्यम्सन आणि ग्लेन फिलिप्सला बाद करून पुन्हा आपल्या संघाला सामन्यात वापसी करून दिली.हीच 20/20क्रिकेटची गंमत आहे. एक खराब किंवा एक चांगले षटक सामन्याचा निकाल बदलवू शकते.

कर्णधार केनने मात्र 20/20च्या अंतिम सामन्यातली एक सर्वोत्तम आणि ऐतिहासिक खेळी करताना केवळ 48 चेंडूत 85 धावा ठोकताना दहा चौकार आणि तीन षटकार मारले, मात्र कमिन्सने आणि शेवटच्या षटकात स्टार्कने बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाचा डाव 172 धावांवर रोखण्यात यश मिळवले.

कारण एकवेळेस केन मैदानावर असताना किवी संघ 190 ते 200च्या आसपास जाईल असे वाटत असतानाच हेजलवूडने एकाच षटकात दोन महत्वपूर्ण गडी बाद करून सामन्यात पुन्हा रंगत निर्माण केली.

आता ऑस्ट्रेलिया संघांला विजेतेपद मिळवायचे असेल तर जबरदस्त चमत्कार करावा लागेल. आता तो चमत्कार ते करणार की केन विल्यम्सचे चतुरस्त्र नेतृत्व किवी संघाला विजेते करणार हे अगदी काहीच तासात कळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.