Talegaon : लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परीक्षा घेतल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे दाखल

Charges filed against 14 people for taking exams in violation of lockdown

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून घेण्यात आलेल्या इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे स्नेहवर्धक संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील पंचवटी काॅलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अँड काॅमर्स काॅलेजने लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याची पायमल्ली करून चालू असलेल्या इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली.

आज, शुक्रवार (दि 12) रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान इयत्ता 11वी काॅमर्स आयटी विषयाची परीक्षा घेण्याकरिता शाळेच्या syjc lectures या व्हाटस अप ग्रुपवर परिक्षेचे वेळापत्रक टाकण्यात आले.

त्यानुसार 27 विद्यार्थ्यांना बालविकास शाळेत बोलावून त्यांची परिक्षा घेण्यात आली. हा प्रकार आढळून आल्याने स्नेहवर्धक शैक्षणिक ट्रस्टच्या संचालक मंडळ तसेच सदर शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रत्यक्ष परिक्षा घेणारा पर्यवेक्षक वर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणा-या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एम. एस. गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकूण 27 विद्यार्थी परीक्षेस बसलेले आढळून आले आहेत.

मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर कडक कारवाईची सक्त ताकीद दिली.

त्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त डॉ. संदीप  बिष्णोई यांनी वैयक्तिक लक्ष दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.